खानापूर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधी:
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांत उत्तर भारतीयांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. मातृभाषा हिंदीवर असणारे प्रभुत्व हे त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाबरोबरच मातृभाषेवर प्रभुत्व संपादन करावे. पण, हिंदी आणि इंग्रजीकडेही दुर्लक्ष करू नये, असे आवाहन समुत्कर्ष संस्थेचे संयोजक प्रा. जितेंद्र नाईक यांनी केले.
स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी लोकमान्य सभागृहात शनिवारी (दि. ५) कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष चेतन मणेरीकर अध्यक्षस्थानी होते.
ते पुढे म्हणाले, आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचा मार्ग खडतर असला तरी प्रयत्नांतील सातत्य आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास यशाची गुरुकिल्ली अभ्यासक्रमातील विषयांबरोबरच आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडी व महत्त्वपूर्ण घटनांची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आतापासूनच अभ्यासाची नेमकी दिशा ठरवावी, असा सल्ला त्यांनी दिला अध्यक्षस्थानावरून बोलताना आधीवक्ते चेतन मणेरीकर म्हणाले, तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना तोंड देण्याची पुरेशी क्षमता आहे. शालेय स्तरावर त्यांच्याप्रयत्नांना योग्य दिशा दिल्यास राष्ट्राच्या उभारणीत खानापुरातूनही चांगले तरुण दिसल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तंत्राविषयी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. समुत्कर्ष संस्था अशा ८० मुलामुलींना प्रशिक्षण देणार आहे