कक्केरी: प्रतिनिधि
बालवयापासून उत्तम संस्कार, शिक्षणाचे धडे व खेळाची आवड या गोष्टी प्रत्येक बालकात निर्माण कराव्या लागतात. मातीच्या गोळ्याप्रमाणे घडवलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्या आकलन क्षमतेनुसार बौद्धिकता वाढत असते. व्यक्ती घडवण्यासाठी आई नंतर गुरु यांचे योगदान महत्त्वाचे असून जन्मतःच कोणी विजेता म्हणून जन्माला येत नाही. तर त्याला लहानपणापासून घडवावे लागते. तरच तो यशाचे शिखर गाठू शकतो असे विचार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित श्रीयुत यल्लाप्पा गुपित यांनी बोलताना व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील कार्यरत असलेल्या जे. के. कॉन्व्हेंट स्कूल मध्ये (सीसीए) मधील विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते यल्लाप्पा गुपित, कार्तिक अंबोजी, पिरप्पा पिरोजी, आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व पारितोषिक वितरण करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व प्राचार्य वर्ग उपस्थित होते.