खानापूर-
खानापूर तालुका वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील गवळी धनगर व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांच्या अरण्यहक्काचे प्रस्ताव बनविण्याची प्रक्रिया येथील तळेवाडी गवाळी, धनगर वाड्यावरून आज सुरवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व गवळी धनगर व अरण्य अतिक्रमित जमीन धारकांचे लवकरच बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करून परिपूर्ण असे दावे लवकरच अरण्य हक्क समितीच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.
गेली वर्ष दोन वर्षे श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व निमंत्रक महादेव मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली अरण्य हक्काची चळवळ चालू आहे. या चळवळीच्या वतीने अरण्य हक्काच्या संदर्भात अनेक शिबीरे, कार्यशाळा आणि बैठाका व परिषदा झाल्या. गेल्या वर्षी तहसील कार्यलयावर मोठा मोर्चाही झाला. या नंतर एक दिवसाचे धरणे आंदोलन पंचायत समिती समोर झाले. त्यानंतर आज सोमवारी तळेवाड गवळीवाडा येथे अरण्य हक्काचे दावे बनविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. खानापूर तालुक्यातील सर्व अरण्य अतिक्रिमित धाराकांचे परिपूर्ण प्रस्ताव लवकरच पूर्ण करून शासनाला सादर करण्यात येणारं आहेत.
यावेळी महाराष्ट्रातील असे प्रस्ताव बनवून ज्यांनी अरण्य हक्कचे दावे मंजूर करून घेतले आहेत असे कार्यकर्ते बयाजी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभिजित सरदेसाई, सिंधुदुर्ग डायसिसचे राजेंद्र कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक गवळी वाड्यावरचे धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.