हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ : गोवा, महाराष्ट्रातूनही भाविकांची रीघ
खानापुर लाईव्ह
प्रति बारा वर्षांनी होणाऱ्या कणकुंबी येथील गंगा भागीरथी प्रकट सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या आठ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली देवी यात्रोत्सवात रविवारी देवींच्या संगम सोहळ्याला गर्दीचा महापूर लोटला . कणकुंबी, चिगुळे आणि कोदाळी माऊलींच्या भेटीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी दीड लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने रस्ते आणि कणकुंबी गाव अपुरा पडल्याचे दिसून आले. इतक्या गर्दीतही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
रविवार हा या यात्रेचा मुख्य दिवस होता कुडाळी माऊलीचे चिगुळी येथे आगमन झाल्यानंतर त्या दोन्ही मावल्या कणकुंबी माऊलीच्या भेटीसाठी येतात येतील होंड्याच्या माळावर असलेल्या ठिकाणी या तिन्ही माऊलींचा दुपारी १२ वा. तिन्ही माऊलींचा संगम सोहळा पार पडला यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकरचा अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या सौजन्याने या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संगम सोहळ्यानंतर तिन्ही देवींचा पालख्या येथील तीर्थावर आल्यानंतर गंगा स्नान आणि गंगा आरती पार पडली. दुपारी माऊली देवी सभामंडपात विराजमान झाली. ४ वा. पासून ओटी भरण्यास सुरुवात करण्यात आली. अलोट गर्दीमुळे वाहतुकीचा चक्काजाम झाल्याने भाविकांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. बुधवारी यात्रेची सांगता होणार असून बेळगाव जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून तसेच गोवा, चंदगड येथून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असल्याने कणकुंबी गावाला उधाण आले आहे. माऊली मंदिरात आता तीन दिवस या देवींची बैठक राहणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेची सांगता 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दीड लाखावर भाविकांची उपस्थिती नेटवर्क जाम
कणकुंबी माऊली देवीच्या उत्सवाला महाराष्ट्र गोवा कर्नाटकातून अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली होती जांबोटी चोरला मार्गावर एकच रांग वाहनांची लागली होती शिवाय त्याच पटीने मंदिर परिसरातील भाविक दाखल झाले होते.दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याने रेंज व्यवस्थेवरील ताण वाढून मोबाईल नेटवर्कवर परिणाम झाला. येथील जिओच्या टॉवरचे काम बंद पडले. त्यामुळे दिवसभर मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.