खानापूर
गेल्या 27 फेब्रुवारीला बेळगाव येथे झालेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रोड-शो व सभेला गेलेला एक वृद्ध पुन्हा घरी परतलाच नाही. त्यामुळे आमच्या आजोबाचा शोध घ्या, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी खानापूर पोलीस स्थानकात केली आहे. याबाबत मिळालेली माहिती की, बेळगाव येथे गेल्या 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सभा व रोड शो झाला या सभेसाठी जांबोटी येथील मारुती गोविंद देसाई वय 70 हे आजोबा गेले. परंतु गेले सात आठ दिवस झाले ते पुन्हा परतलेच नाही.
27 फेब्रुवारी रोजी बेळगांव, येडीयुराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे मोदींची मोठी सभा झाली. लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित होते. त्यामध्ये मारुती देसाई आजोबाही सहभागी झाले होते. पण त्या सभेनंतर ते घरी परत आलेच नाहीत. त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी खानापूर पोलीस स्थानकाची धाव घेऊन परिस्थितीची माहिती दिली. अद्याप यासंदर्भात खानापूर पोलिसात रीतसर बेपत्ता झाल्याची नोंद झाली, नसली तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध जारी केली आहे. वरील छायाचित्राची संबंधित व्यक्ती आढळल्यास खानापूर पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.