खानापूर मराठी संस्कृती प्रतिष्ठानच्या गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत. त्यांना बाल वयातच योग्य दिशा दिली तर भविष्यात उत्तम गायक आणि कलाकार घडू शकतात. खानापूर तालुक्याच्या माती आणि माणसांमध्ये कलेवर प्रेम करण्याचे संस्कार आहेत. ते जपण्यासाठी कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहनाचे बळ द्या असे आवाहन लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवस्मारक येथे आयोजित गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी चालवलेले उपक्रम अभिमानास्पद आहेत. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षा तसेच वक्तृत्व, निबंध आणि गायन स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ निर्माण करून देण्याचे कार्य संस्थेची सामाजिक बांधिलकी दर्शवणारे आहे. अध्यक्ष कापोलकर यांनी, मराठी प्रेमी जनतेच्या सहकार्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून मराठी शाळा आणि भाषेच्या संवर्धनार्थ काम करता आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून असे अभ्यासेतर उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. भाजप नेते किरण येळ्ळुरकर, गुंडू तोपिनकट्टी, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार, माजी ता. पं. उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ, म. ए. समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, निवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब दळवी, विठ्ठल गुरव, मऱ्यापा पाटील, ईश्वर बोबाटे आदी उपस्थित होते. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.
मराठी भाषा दिनी होणार विजेत्यांचा सन्मान
प्राथमिक, माध्यमिक आणि खुल्या अशा तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शहर व ग्रामीण भागातील नवोदित गायकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. अनेक स्पर्धकांनी गाण्याला साजेशा वेशभूषेत येऊन सादरीकरण केले. त्यामुळे ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. स्पर्धेतील विजेत्यांना 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.