मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात पत्रकारितेवर राष्ट्रीय चर्चासत्र
खानापुर प्रतिनिधी ; पत्रकारिता हे दुधारी शस्त्र आहे. नवी कौशल्य आणि तंत्र आत्मसात करत असताना सामाजिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक होईल हे भान पत्रकारांनी ठेवणे आवश्यक आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचितांना न्याय मिळवून देताना पत्रकार लेखणीबरोबरच लढवय्या कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्याच्या कार्याचा समाजाने योग्य गौरव करणे आवश्यक आहे. माणुसकी आणि संवेदना नसेल तर कितीही मोठे कर्तृत्व समाजाच्या कुचकामी ठरते. पत्रकारिता ही अपवाद नाही. असे प्रतिपादन दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी वासुदेव चौगुले यांनी केले. येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात तंत्रज्ञानाचा पत्रकारितेवरील परिणाम, लिंग समानता आणि महिला सबलीकरण या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जे. के. बागेवाडी होत्या.
न्याक संयोजक प्राध्यापिका विजयालक्ष्मी तीर्लापूर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बदलत्या आव्हानांना सामोरे जात पत्रकारितेकडून होणारे समाज आणि राष्ट्र ऐक्य संवर्धन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी म्हणाले, पत्रकारांनी तालुक्यातील प्रतिकूल परिस्थितीत लेखणीचा वसा जपताना दुर्गम भागातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. निस्वार्थी पत्रकारिता खानापूरच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत आहे. पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचन मनन आणि परिसर भ्रमण या गोष्टी आवर्जून कराव्यात असे आवाहन केले. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कोणत्याही नफ्याची अपेक्षा न बाळगता लेखणी झिजवण्याचे कार्य करतो. त्यामुळे समाजात शांती आणि एकोपा टिकून आहे. समाजाला निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारांची गरज असून नव्या दमाच्या तरुणांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा. नव्या संधींचा उपयोग करून घेतल्यास पत्रकारितेत चांगले करिअर करता येते असे सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. जे. के. बागेवाडी, प्रा. तिरलापूर, प्रा.डॉ. आय. एम. गुरव आदींच्या हस्ते तालुक्यातील सर्व पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. विजयालक्ष्मी तिरलापूर यांना यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही उपस्थित पत्रकारांच्या हस्ते कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ. आय एम गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा जे.बी आंची यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व भाषा विभागांचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत गीत माहेश्वरी आणि ग्रुपने सादर केले. दीप प्रज्वलन पत्रकार प्रसन्न कुलकर्णी यानी करुन चर्चा चर्चासत्राचे उद्घाटन केले. पत्रकार विवेक गिरी, रमेश मगदूम, हणमंत गुरव आदी उपस्थित होते. जिमखान्याचे उपाध्यक्ष प्रा.वाय.एस.धबाले. व इतर प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.