खानापूर (प्रतिनिधी):
माजी मुख्यमंत्री व निधर्मी जनता दलाचे नेते एच.डी कुमारस्वामी यांचा आज शुक्रवार दि 10 रोजी खानापूर दौरा होत आहे.
कर्नाटकात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधर्मी जनता दलाने आपल्या पक्षांतर्गत नवीन योजना अंमलात आणल्या आहेत या योजनांचा संपूर्ण कर्नाटकात प्रचार अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. यानुसार माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी उत्तर कर्नाटकातील पाच दिवसाच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. पहिला दौरा खानापूर तालुक्यात होणार असून गुरुवारी रात्री माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी लिंगनमठ येथे मुक्काम केला आहे. सकाळी नऊ वाजता लिंगमनठ येथून खानापूर तालुक्यातील विविध गावांना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी भेटी देणार आहेत. लिंगनमठ येथून सुरू झालेल्या अभियानात कक्केरी, बिडी, मंग्यानकोप तेथून पारीश्वाड, देवलती या गावात अभियान होणार आहे.
लोकोळी-जैनकोप श्री महालक्ष्मी यात्रेला देणार भेट
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पंचतंत्र जागृती अभियानात अंतर्गत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी दुपारी 3 वाजता लोकोळी श्री महालक्ष्मी यात्रेच्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी अभियान राबवणार आहेत. त्यानंतर चापगाव, कारलगा, नंदगड मार्गे हलशी या ठिकाणी त्यांचे अभियान होणार आहे. व सायंकाळी हलशी या ठिकाणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुक्काम असेल. त्यानंतर उद्या शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा होणार आहे.
वाहनांचा ताफा व सजवलेल्या बसेस
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या दौऱ्यात चार ते पाच बसेस राहणार आहेत. सदर बसेस पंचतंत्र अभियान संदेश देणाऱ्या पोस्टर्सनी सजवण्यात आले आहे प्रत्येक गावातून ही वाहने फिरवण्यात येणार असून गावात प्रमुख ठिकाणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी एका विशेष वाहनातून नागरिकांना अभिवादन करणार आहेत या अभियानात 200 हून अधिक कार्यकर्त्यांचा ताफाही या दौऱ्यासोबत राहणार आहे.