खानापूर: खानापूर तालुक्यातील निधर्मी जनता दलाचे प्रभावी नेते नासिर बागवान यांच्या 66 व्या वाढदिवसाचे औचित साधून 2 फेब्रुवारी 2023 रोजी खानापुरात भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध मठाचे मठाधीश यासह माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, जेडीएसचे राज्याध्यक्ष सी.एम इब्राहिम सह निजदचे वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती खानापूर तालुका निधर्मी जनता दलाचे अध्यक्ष एम. एम. सावकार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत बोलताना निजद नेते नासिर बागवान म्हणाले, आपला वाढदिवस 02 फेब्रुवारी रोजी आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेसह वारकरी तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी माझा वाढदिवस अनेक स्वामीजी तसेच निजतेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यासाठी योजना आखली आहे. या निमित्ताने सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी शिवरायाला अभिवादन करून एक भव्य रॅलीतून तालुका मलप्रभा क्रिडांगणावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आशीर्वाचन करण्यासाठी खानापूर तालुक्याचा विविध भागातून जवळपास पंधरा ते वीस मठाधीश उपस्थित राहणार आहेत. शिवाय निधर्मी जनता दलाचे वरिष्ठ नेते माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनाही निमंत्रित केले आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, जे डी.एसचे राज्याध्यक्ष सी.एम इब्राहिम, माजी उपसभापती सचिदानंद खोत, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील राज्य प्रधान कार्यदर्शी फैजुल्ला माडीवाले, जिल्हा अध्यक्ष शंकर माडलगी, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव पाटील सह अनेकांना विशेष निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम
या निजते नेते नाशिर बागवान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मलप्रभा क्रीडांगणावर भव्य सभा व वाढदिवसाचा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी तीन वाजता खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्यासाठी एका कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी 07 वाजता महाराष्ट्रातील भव्य असा मराठमोळा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची ही माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नगरसेविका मेघा कुंदरगी तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील उपस्थित होते विशाल पाटील यांनी निधर्मी जनता दलात सक्रिय होऊन कार्य करणार असल्याची माहिती दिली.