Hu
पिराजी कुऱ्हाडे /प्रतिनिधी:
खानापूर शहर हे तालुक्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. खानापूर शहराच्या चौफेर तालुक्याचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे खानापूर शहरातील बाजारपेठेला विशेष महत्त्व आहे.खानापूर शहरांतर्गत जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अनेक व्यवसायिकांना उद्योग देणारा आहे. पण आता बेळगाव- पणजी व्हाया अनमोड हा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बायपास जात असल्याने आता खानापूर शहरातील बाजारपेठेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर शहरांतर्गत बाजारपेठेतून आजवर वाहतूक वाढली होती. त्यामुळे शहरांतर्गत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक व्यवसायिकांनी कोठ्यावधी रुपये खर्च करून व्यवसाय थाटले आहेत. पण आता बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्ग कार्यरत झाल्याने खानापूर शहराच्या बायपास वाहतूक वाढणार यात शंका नाही. त्यामुळे खानापूर बाजारपेठेला याचा नजीकच्या काळात फटका बसण्याची भीती व्यवसायिकातून व्यक्त केली जात आहे.
खरंतर खानापूर शहराला यापूर्वी असाच मोठा फटका बसला होता. खानापूर शहरातून जाणारा बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्ग पूर्वीपासून जांबोटी क्रॉस, पारीश्वाड क्रॉस ते जुन्या पुलावरून रुमेवाडी क्रॉसला जोडणारा होता. पण चाळीस वर्षांपूर्वी शहराला सध्या असलेला शहरांतर्गत महामार्ग कार्यरत झाल्याने मारुती नगर व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील व्यवसायाला अवकळा पसरली. या भागातील सगळे व्यवसाय मागे राहिले, बघता बघता खानापूर शहराची बाजारपेठ रेल्वे स्टेशन मार्गाकडील शहरांतर्गत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पसरली. गेल्या 30-35 वर्षांमध्ये या ठिकाणी मोठमोठे व्यवसाय हॉटेल्स, शाळा, तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे त्याचप्रमाणे बँकिंग व्यवसाय सर्व या भागात पसरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला ही बाजारपेठ लाभदायी असली तरी शहराच्या बायपास जाणारा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसाय सह विविध उद्योगांना मात्र याचा फटका बसणार यात शंका नाही. यापूर्वी लोंढा -अनमोड मार्गावरील वाहतूक सुरू होती. पण गेल्या सात आठ वर्षांमध्ये महामार्गाचे काम महामार्ग प्राधिकरणाने घेतल्यानंतर या रस्त्याचे तीन तेरा झाले,,परिणामी चोरला मार्गे गोव्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी खानापूर शहराला यापूर्वीच तसा फटका बसला आहे. पण आता शहराच्या बायपास मराठा मंडळ कॉलेज पासून करंबळ क्रॉस पर्यंत बायपास महामार्ग झाल्याने आता बेळगाव अनमोल गोवा अंतर सोयीस्कर झाल्याने खानापूर शहरात पर्यटकांची पावले कमी पडणार आहेत त्यामुळे व्यवसायीकानाही याचा चांगलाच फटका बसणार आहे
सध्या बेळगाव पासून होनकल पर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्णत झाले आले असून या मार्गावरील वाहतूक गेल्या आठवड्याभरापासून कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे बरेच अवजड वाहने अथवा बेळगावला जाण्यासाठी येण्यासाठी करंबल कत्री किंवा होणकल पर्यंत वाहने सुसाट जात आहेत.खानापूर शहरातून जाण्यासाठी किमान 25 ते 30 मिनिटे लागतात पण करंबळ कत्री पासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवासाला सुरुवात केल्यास मच्छेपर्यंत केवळ दहा मिनिटाचा रस्ता निर्माण झाल्याने वाहने सुसाट जात आहेत. शिवाय लोंढा नंदगड भागातून येणारे वाहनधारक बायपास रस्त्याने बेळगावला जाणे येणे पसंत करत आहेत. वाहतूकदारांना हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत लाभदायी ठरला आहे पण खानापूर शहरांतर्गत व्यापाऱ्यांना याचा नजीकच्या काळामध्ये फटका बसेल की काय अशी शंका मात्र निर्माण झाली आहे.
हत्तरगुंजी-फुलेवाडी ग्रामस्थांचा हेका कायम
खानापूर शहराला आता बायपास महामार्ग करण्यात आल्याने हत्तरगुंजी, फुलेवाडी, मुडेवाडी गावाला जोडणाऱ्या जुन्या संपर्क रस्त्याचा ठिकाणी भुयारी महामार्ग करण्याची मागणी कायम आहे. महामार्ग प्राधिकरणाने पारिस्वाड रस्त्याला असलेल्या भुयारी रस्त्यावरून हतर गुंजीला जाण्यासाठी पर्याय ठेवला आहे. परंतु याला या भागातील नागरिकांनी विरोध दर्शवला असून हुबळी विभागीय महामार्ग प्राधिकरणापर्यंत याची तक्रार केली आहे. त्यामुळे खानापूर शहरांतर्गत हा बायपास रस्ता कार्यारित झाला असला तरी हत्तरगुंजी -मुडेवाडी गावाकडे जाणारा संपर्क रस्ता अद्याप बंद करण्यात आला नाही. त्यामुळे सुसाट वाहने व संपर्क रस्त्यावरील येणारी आडवहाने येजा करत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हत्तरगुंजी गावाकडे जाणाऱ्या संपर्क रस्त्यावरचा पर्याय लवकरात लवकर काढून या ठिकाणी सुसाट वाहने धोकादायक होणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
बेळगाव पणजी वाया अनमोड या राष्ट्रीय महामार्गापैकी बेळगाव मच्छे ते होनकल पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वाला आले आहे. सदर महामार्गापैकी खानापूर शहराला वळसा घालून जाणारा बायपास रस्ता पूर्ण झाला सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आता मार्गस्थ झाली आहे
होनकल ते लोंढा -अनमोड/मच्छे हलगा बायपास महामार्गाचे काम रेंगाळले
बेळगाव खानापूर हा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्याने प्रवासही आता सुखकर झाला आहे पण सुखकर प्रवासाला गनेबैल जवळ झालेला टोलनाका हा खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे. टोल आकारणीही मच्छे-हलगा बायपास रस्ता तसेच होनकल पासून लोंढा अनमोड पर्यंतचा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सदर मच्छे- हलगा बायपास व होनकल -लोंढा -अनमोडचा रस्ता काम करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे.हलगा बायपास प्रकरण न्यायालय प्रविष्ट असल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. तर इकडे लोंढा- रामनगर- अनमोड पर्यंतच्या रस्त्यासाठी हरित लवादाने ग्रीन सिग्नल दिला असला तरी संबंधित कंत्राटदार धीम्या गतीने काम करत आहेत. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होणार हा प्रश्न निरुत्तरित आहे. एकूणच हलगा बायपास ते अनमोड पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतरच टोल प्रक्रिया राबवली जाणार असल्याची शक्यता आहे.
गणेबैल नजीकचा टोल अन् खिशाला कात्री
खानापूर शहराच्या कुशीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा तालुक्याचे वैभव ठरणार आहे या राष्ट्रीय महामार्गावरून हे जा करणाऱ्या वाहनधारकांना सुखकर व सोयीचा ठरला आहे पण गणेश उभारण्यात आलेला टोल नाका मात्र चार चाकी वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावणारा ठरणार आहे गनिवेल नजीकच्या टोलनाक्यावर नेमकी चार चाकी वाहनांना किती आकारणी होणार याची आकडेवारी प्राधिकरणाने जाहीर केली नाही. पण यासाठी खानापूर तालुक्यातील जवळपासच्या वाहनधारकांना पाच ची व्यवस्था किंवा सवलतीची व्यवस्था मिळेल का असा प्रश्नही आहे. कारण खानापूर शहर परिसरातून दररोज बेळगाव परिसरात कामाला जाणारी येणारी शेकडो वाहनधारक आहेत या वाहनधारकांना दररोजचा टोल आकारणी परवडणारा नाही. यासाठी विशेष पास किंवा शुल्क मध्ये सवलत देण्यासाठी प्राधिकरणाने नियमावली ठरवावी अन्यथा खानापूर सह परिसरातील प्रवासी वर्गांना या विरोधात आवाज उठवावा लागेल यात शंका नाही.