आता तरी शहरांतर्गत रस्त्याचे भाग्य उजळेल का?
खानापूर -प्रतिनिधी :
40 वर्षांपूर्वी निर्मित करण्यात आलेला खानापूर शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्ग अन् त्या मार्गावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेला नवीन पुल गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनला आहे. पुल 40 वर्षांपूर्वीचा असला तरी आजही तो नवीन पुलच म्हणून ओळखला जातो. खरंतर तो आता तो “जुना झालाय” हे सध्या त्या पुलाकडे पाहिल्यानंतर नक्कीच दिसून येते. गेल्या दोन दशकांपासून शहरांतर्गत महामार्गाची अनेक वेळा दुरुस्ती झाली, दुभाजीकरण झाले पण मलप्रभा नदीवरच्या पुलाच्या दुरुस्तीकडे मात्र निव्वळ कानाडोळा झालेला दिसून येत आहे. जसे म्हातारपणात प्रत्येकाला काठीचा आधार लागतो त्याच पद्धतीने या पुलालाही आता बांबूच्या काठींचा आधार अखेरचा बनला आहे. नदीवर असलेला हा वाहतुकीचा पुल आता जुना झालाय,या पुलाने अनेक वेळा संकटे झेलली,महापुराचा सामना केला पण दुरुस्तीचे सौजन्य ना,महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधीच्या जाणते पणाकडे राहिले नाही. पुलाच्या दुतर्फ असलेले कठडे अनेक वेळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत पुलावरून महापूर ओसंडला,कठडेही निकामी झाले. या कठड्यांची भक्कम दुरुस्ती कधीच झाली नाही. सद्य परिस्थितीत कठडे तुटून,वाहून गेल्याने केवळ लोखंडी बार शिल्लक आहेत.अन जसे वय झालेल्या व्यक्तीला काठीचा आधार द्यावा लागतो त्याच पद्धतीने या कठड्यांना आता बांबूचा आधार बनला आहे. खरंतर शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गावरील पुलाची ही दयनीय अवस्था केविलवाणी ठरते यात शंका नाही. शिवाय पावसाळ्यात या पुलावर अनेक वेळा पाणीच साचते, शाळकरी मुलासह पादचाऱ्याना मोठा फटका बसतो.पण दुरुस्तीचे सौजन्य मात्र गेल्या सात आठ वर्षांमध्ये कधीच झाले नाही. त्यामुळे जुन्या झालेल्या या नवीन पुलाची दुरुस्ती होईल का असा प्रश्न प्रवासी वर्गातून केला जात आहे.
शहरांतर्गत महामार्ग आणि पावसाळ्यातील समस्या
- खरंतर खानापूर शहराचा बायपास रस्ता झाल्या क्षणीच शहरांतर्गत महामार्ग तसेच रुमेवाडी फाट्या जवळचा रस्ता हा पावसाळ्यात नेहमी चर्चेत असतो. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण होते. या खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात आंदोलने झाली, आम्ही काय करू? अशी उत्तरे झाली. अन तात्पुरती दुरुस्ती झाली, अनेकांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्नही मागील पावसाळ्यात झाले, आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पण पावसाळ्यातील संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. आता बायपास राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे तातडीने खानापूर शहरांतर्गत जाणारा राष्ट्रीय महामार्ग, नदीवरील पुलाची दुरुस्ती व रूमेवाडी फाट्यापासून कत्रीपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था यासंदर्भात कोणी आवाज उठविला तर नवल नव्हे.