पुणे येथे खानापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात
फोटो : पुणे : खानापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित विठ्ठल हलगेकर, रामू गुंडप,
खानापूर लाईव्ह
गावाकडून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन उद्योग-व्यवसाय उभा करणे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करूनही नेहमी जमिनीवर पाय ठेवणे. ही पुणेस्थित खानापूरकरांची खासियत आहे. या उद्योजकांनी उद्योग, व्यवसायासाठी खानापूर तालुक्याकडेही लक्ष देऊन गावाकडच्या माणसांच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते विठ्ठल हलगेकर यांनी केले.
धायरी पुणे येथे खानापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केपीएलचे अध्यक्ष व उद्योजक रामू गुंडप होते.
विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापूरच्या ग्रामीण भागातील उद्योजकांनी पुण्यासारख्या ठिकाणी उद्योजक म्हणून मिळवलेला नावलौकिक अभिमानास्पद आहे. या कर्तृत्वाचा गावाकडील तरुण पिढीलाही लाभ व्हावा. यासाठी गावाकडच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कार्याला हातभार लावावा. रोजगाराची वाट शोधत पुण्यात आलेले उद्योजक गावाकडील बेरोजगारीसाठी बरेच काही करू शकतात. खानापूर तालुक्यात उद्योगधंद्यांना पुरेसे पाठबळ आहे. त्याचा उद्योजकांनी विचार करावा असे आवाहन केले.
रामू गुंडप यांनी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यात विखुरलेल्या खानापूरकरांना एकत्र आणून त्यांच्या अडी-अडचणी आणि प्रगती विषयी हितगुज साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक सचिन पाटील यांच्या श्रवण इलेव्हन संघाने, द्वितीय क्रमांक जोतिबा माळवी यांच्या चाळोबा इलेव्हन संघाने, तृतीय क्रमांक मारुती पाटील यांच्या आनंदी एंटरप्राइजेस संघाने तर चौथा क्रमांक सुनील रेडेकर यांच्या आनंदगड प्रतिष्ठान संघाने पटकाविला. सुभाष वाकाले याने उत्कृष्ट फलंदाज तर शंकर कोलेकर याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर मित्र मंडळचे अध्यक्ष पीटर डिसोजा, सचिव शिवाजी जळगेकर, केपीएलचे उपाध्यक्ष विनायक गुरव, खजिनदार रामदास घाडी, सचिव सचिन पाटील, सुरेश हलगी, परशराम वीर, मारुती वाणी, नारायण गावडे, भगवान चन्नेवाडकर, अतुल दांगट, बाळासाहेब देसाई, काकासाहेब चव्हाण, राजाभाऊ लायगुडे, रूपाली चाकणकर, लक्ष्मण काकतकर, ज्ञानेश्वर मुतगेकर, योगेश माळवी, राजू शिंदे, रामचंद्र निलजकर, परशराम निलजकर, दत्ता पडळकर, विशाल कदम, सुरेश कोलकार, संतोष कोठेकर, नितीन शिंगारे, पुनम पाटील, किशोर पोकळे, अनिल भूमकर, भरमाणी पाटील, गुंडू पाखरे आदि उपस्थित होते.