खानापूर: तालुक्यातील प्रसिद्ध जागृत देवता व मलप्रभा नदीचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी माऊली देवस्थानचा 12 वर्षांनी भरणारा यात्रा महोत्सव बुधवार पासून प्रारंभ झाला आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रोत्सवाचा मुख्य दिवस रविवारी राहणार आहे.या तीनही देवींचा संगम सोहळा हा महत्त्वाचा राहणार आहे.
बुधवारी सुरुवात झालेल्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर मध्ये मूर्ती प्रतिष्ठापनापूर्व धार्मिक विधी कार्यक्रम हाती घेण्यात आल्या. या निमित्ताने कणकुंबी गावात सकाळी जल्लोषी मिरवणूक झाली. त्यामध्ये शेकडो महिलांनी डोकीवर वारकऱ्यासह महिलांनी मोठ्या संख्येने दिंडी पथकामध्ये सहभाग घेतला होता. रात्री भडजींच्या उपस्थितीमध्ये मूर्तीला अभिषेक व रात्रभर भिजत ठेवण्याचा कार्यक्रम झाला. गुरुवारी सकाळपासून होमवन व धार्मिक विधी पार पडल्या. मानकरयांच्या हस्ते मूर्तीमध्ये दैवत भरण्याचा कार्यक्रम झाला.
शुक्रवार दि 10 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम
नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिर मध्ये श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना श्री रामेश्वर मंदिराचा कळसारोहन कार्यक्रम शुक्रवार दि 10 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे
या निमित्ताने हिंदुस्तानी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांची वंदनीय उपस्थिती राहणार आहे.त्यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी होणार असून या वेळेला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांची उपस्थिती बुधवारपासून लाभत आहे. बुधवारी जवळपास 5000 भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. तर गुरुवारी 3000 पेक्षा जास्त भाविक या मंदिर परिसरामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते.एकूणच या यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस रविवार असणार आहे.
रविवारी तीनही माऊली देवींचा भेटी सोहळा
कळसगादे गुळंब, केंद्रे -वीजघर च्या कोदाळी माऊली ची पालखी शनिवारीची चिगुळे या ठिकाणी दाखल झाली आहे. त्या ठिकाणी चिगुळे माऊली व कोदाळी माऊलीचा संगम सोहळा झाल्यानंतर रविवारी सकाळी कोदाळी व चीगुळे माऊली धुळ्याच्या होंडा असलेल्या संगम स्थळावर दाखल होते. तर इकडून कणकुंबी माऊलीची पालखी व मूर्ती त्या ठिकाणी भेटीसाठी जाते. एकूणच या तिन्ही माउली या धुळ्याच्या होंडाच्या ठिकाणी भेटतात. याला महासंगम सोहळा असे म्हटले जाते. संगम सोहळ्याला जवळपास दहा हजार हून अधिक भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पंच कमिटीनेही या ठिकाणी तयारी आखली आहे. त्यानंतर तिन्ही माऊली एकत्रितपणे जल्लोषामध्ये माऊली मंदिरे कडे येतात. येथील माऊली तीर्थक्षेत्रावर ज्याला आपण तळी म्हणतो या ठिकाणी तिन्ही माउली येतात, त्या ठिकाणी धार्मिक विधी केल्या जातात. त्यानंतर त्या तिन्ही माउलींची माऊली मंदिरामध्ये तीन दिवस बैठक असते. त्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी येथील पंच कमिटी व ग्रामस्थांनी जय्यत तयारी हाती घेतली आहे. या यात्रा उत्सवाची सांगता बुधवार दि 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे सायंकाळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान कमिटीने हाती घेतले आहे