प्रतिनिधि / कणकुंबी
कणकुंबी येथील चौदा वर्षांनी नुकताच संपन्न झालेल्या माऊली देवी यात्रोत्सवाला आलेल्या भक्तगणाकडून तसेच येथील व्यापारी व यात्रेतील दुकानदार यांनी टाकलेल्या केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शतावरी रिसॉर्ट,श्री माऊली विद्यालय व ग्रामपंचायत कणकुंबी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दि.८ ते १५ फेब्रुवारी असे आठ दिवस चाललेल्या यात्रेसवांला जवळपास आठ ते दहा लाख लोकांनी हजेरी लावली होती.यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात जिकडेतिकडे प्लास्टिक पिशव्या,केरकचरा,प्लास्टिक बॉटल व इतर सर्व प्रकारचा कचरा मंदिराच्या परिसरात विखुरलेला होता.गेले चार पाच दिवस गावातील दिवसा पाळीव जनावरं व रात्री जंगली जनावरं या केरकचऱ्यामध्ये फिरत असत.जनावरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेऊन केरकचऱ्याची विल्हेवाट लावणे जरुरीचे होते,त्यासाठी शतावरी रिसॉर्टचे मालक किरण गावडे यांनी पुढाकार घेऊन शतावरी रिसॉर्ट,श्री माऊली विद्यालय,प्राथमिक शाळा तसेच ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.यामध्ये जवळपास अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
मंदिराच्या एक ते दोन किलोमीटर परिसरात प्लास्टिक केरकचरा व इतर सर्व प्रकारचा कचरा विखुरला होता. यात्रा काळात आलेल्या भाविक भक्तांनी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी रामेश्वर मंदिर परिसर तसेच माऊली मंदिराचा परिसर व पार्किंग व्यवस्था करण्यात आलेला परिसर, या सर्व ठिकाणाचा केरकचरा गोळा करून तो जाळण्यात आला. प्लास्टिक युक्त कचरा खाण्यासाठी गावातील गुरेढोरे तसेच जंगली प्राणी दिवसाढवळ्या या ठिकाणी फिरत होते.जनावरांना हा केरकचरा घातक असतो तसेच या कचऱ्यामुळे निसर्गाचा सुद्धा समतोल बिघडू शकतो म्हणून त्याची विल्हेवाट लावणं हे आपलं कर्तव्य आहे.स्वच्छ भारत स्वच्छ अभियान या उपक्रमांतर्गत देशपातळीवर अनेक उपक्रम राबविले जातात.आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत.तेव्हा प्रत्येकांने याची जाणीव ठेवून आपले घर, परिसर व गाव स्वच्छ केले तर देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.तेंव्हा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पडूया असे शतावरी रिसॉर्टचे मालक व बेळगाव जिल्हा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले होते. यांनुसार अभियान राबवण्यात आले.
यावेळी कणकुंबी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष रमेश खोरवी,श्री माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी चिगुळकर व त्यांचे सहकारी टी.एल.बिर्जे, बी.एम.शिंदे,एस.आर.देसाई,विजय गावडे, नेताजी घाडी,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस आर अवताडे तसेच कणकुंबी गावचे प्रतिष्ठित पंच व देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम गावडे,संजय वरंडेकर,संतोष नाईक,देमू गवस व इतर उपस्थित होते.या स्वच्छता मोहीम उपक्रमानंतर माऊली मंदिराकडे सर्व विद्यार्थ्यांना शतावरी रिसॉर्टच्यावतीने अल्पोपहार देण्यात आला.याप्रसंगी शतावरी रिसॉर्ट मधील सर्व महिला कामगारही व इतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाली होते.