खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची एकी झाली ,आता समितीने रणसिंग ही फुंकले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी येत्या 6 फेब्रुवारीपर्यंत आपले अर्ज समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करावेत असे आवाहन सोमवारी शिवस्मारकात तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्यात विभागीय उपसमितीच्या कार्यकारणीची रचना करण्यात आली. त्यामध्ये पाच उपाध्यक्षांची निवड ही घोषित करण्यात आले. यानुसार जांबोटी भागातून जयराम देसाई , लोंढा भागातून कृष्णा मन्नोळकर नंदगड भागातून अर्जुन देसाई , गर्लगुंजी भागातून कृष्णा कुंभार तर खानापूर शहरातून मारुती गुरव असे पाच उपाध्यक्ष करण्यात आले . कुप्पटगिरी गावातून खजिनदार पदावर ज्येष्ठ कार्यकर्त्याला देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अनेक समितीचे जेष्ठ पदाधिकारी सीमा सत्याग्रही उपस्थित होते.