खानापूर शिवस्मारक ट्रस्टचा महामेरू स्वर्गीय एम. पी. पाटील!
खानापूर शिवस्मारक ट्रस्टचा महामेरू स्वर्गीय एम. पी. पाटील!
बाराव्या दिनी शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
खानापूर / प्रतिनिधी : प्रत्येकाचे जीवन हे संघर्ष आणि वाटचालीतून घडत असते. मात्र आपल्या संपूर्ण आयुष्याचा समाजसेवेसाठी उपयोग करून घेणारी माणसे समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरतात. अशाच उच्च विद्याभूषित, समाजातील वंचित व सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्री. एम. पी. पाटील ऊर्फ मनोहर परशराम पाटील (वय 80) यांच्या निधनाने खानापूर तालुक्याने एक सेवाभावी, अभ्यासू आणि दूरदृष्टीचा व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
एम. पी. पाटील यांचे 20 सप्टेंबर 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त बाराव्या दिनी खानापूर शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
एम. पी. पाटील हे 1984 पासून खानापूर शिवस्मारक ट्रस्टचे क्रियाशील सदस्य होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ट्रस्टचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर माजी आमदार स्वर्गीय व्ही. वाय. चव्हाण यांच्या निधनानंतर 2015 मध्ये शिवस्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. सलग सुमारे अकरा वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य करताना शिवस्मारकाची भक्कम बांधणी, संघटन आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
शिक्षक म्हणूनही उल्लेखनीय कार्य
एम. पी. पाटील हे पूर्वाश्रमीचे उत्तम शिक्षक म्हणूनही परिचित होते. मराठा मंडळ संस्थेत त्यांनी 25 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे शिक्षकी सेवा बजावली. खानापूर, बेळगाव-काकती आणि माडीगुंजी येथील माध्यमिक विद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
1946 च्या सुमारास प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या एम. पी. पाटील यांनी शिक्षणाला जीवनात सर्वोच्च स्थान दिले. त्या काळातील अनेक अडचणींवर मात करत त्यांनी बी.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
कामगारांच्या प्रश्नांसाठीही संघर्ष
शिक्षकी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. खानापूर परिसरातील सिरॅमिक उद्योगातील कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी संघटनात्मक कार्य केले. सुरुवातीच्या काळात सोमन सिरॅमिकमध्ये केवळ दोन रुपये दैनंदिन मजुरीवर काम करत त्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष सुरू केला. पुढे शिक्षकी पेशात प्रवेश करून त्यांनी प्रदीर्घ काळ ज्ञानदानाचे कार्य केले.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी थांबली नाही. सीमा प्रश्नाच्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय राहिले. सीमा सत्याग्रही स्वर्गीय नागाप्पा होसुरकर यांच्या हौतात्म्यानंतर कुपटगिरी परिसरातून त्यांनी सीमा चळवळीला बळ देण्याचे कार्य केले. स्थानिक जनतेशी आपुलकीने जोडून त्यांनी सीमा प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविला.
अभ्यासू, वक्तृत्ववान आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व
एम. पी. पाटील यांना वाचनाची, पुस्तक संग्रहाची आणि प्रभावी वक्तृत्वाची विशेष आवड होती. त्यांचे सुंदर हस्ताक्षर आणि बोलके, प्रेरणादायी शब्द अनेकांना भावत असत. सुशिक्षित, प्रेमळ, शिस्तप्रिय आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
कुपटगिरीसारख्या मराठमोळ्या गावात शेतकरी कुटुंबात पाच भाऊ आणि पाच बहिणींच्या सहवासात त्यांचे बालपण गेले. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येताना त्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांना आपल्या जीवनाचे ध्येय बनविले.
पुढच्या पिढीलाही दिले शिक्षणाचे संस्कार
एम. पी. पाटील यांनी आपल्या कुटुंबातही शिक्षणाला विशेष महत्त्व दिले. त्यांच्या कन्या पद्मश्री पाटील यांनी चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत उच्च शिक्षण घेत खानापूर तालुक्यातील पहिल्या महिला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून लौकिक मिळविला, तर त्यांच्या मुलानेही डिप्लोमापर्यंत शिक्षण घेत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती केली.
एम. पी. पाटील यांचे कार्य केवळ शिवस्मारक ट्रस्टपुरते मर्यादित नव्हते. खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांसह सर्व समाजघटकांसाठी त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्य प्रेरणादायी राहणार आहे.
त्यांच्या निधनाने कुपटगिरीतील पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून खानापूर शिवस्मारक ट्रस्टमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
स्वर्गीय एम. पी. पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
शोकाकुल :
शिवस्मारक ट्रस्टचे पदाधिकारी, खानापूर