Home » खानापूरच्या के.एल.ई. मैदानावर ताराराणीच्या लेकींचा पुन्हा चॅम्पियनशिपवर कब्जा!

खानापूरच्या के.एल.ई. मैदानावर ताराराणीच्या लेकींचा पुन्हा चॅम्पियनशिपवर कब्जा!

file_00000000056882119ec7285203ffe7e2

खानापूरच्या के.एल.ई. मैदानावर ताराराणीच्या लेकींचा पुन्हा चॅम्पियनशिपवर कब्जा!

तालुकास्तरीय युवा क्रीडा महोत्सवात महिला खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; धावणे, कबड्डीत प्रथम क्रमांक, थ्रो बॉलमध्ये द्वितीय क्रमांक

खानापूर : प्रतिनिधी

खेळाडूंच्या मनात जिद्द, शरीरात शिस्त आणि सातत्याने मेहनत करण्याची तयारी असेल, तर खेळाडू यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतात, असे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी व्यक्त केलेले विचार म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कामगिरीतून पुन्हा एकदा सार्थ ठरवले आहेत.

खानापूर येथील के.एल.ई. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयांच्या युवा क्रीडा महोत्सवात म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी सर्वसाधारण महिला चॅम्पियनशिप चषक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.

शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत देदीप्यमान निकाल, बोर्ड परीक्षेतील यश, तालुक्यातील पहिले पाच क्रमांक मिळविण्याची कामगिरी यासोबतच सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून देशप्रेम व्यक्त करणे, पद्मजादेवी ग्रंथालयाचा अर्पण सोहळा आणि ई-कचरा संकलन केंद्रासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यातही महाविद्यालय अग्रेसर आहे.

कबड्डी आणि खो-खो या पारंपरिक खेळांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या ताराराणीच्या विद्यार्थिनींनी कित्तूर येथील राणी चन्नम्मा चषक, बेळगाव जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धा, नंदगड येथील तरुण क्रीडा मंडळाची कबड्डी स्पर्धा तसेच गर्लगुंजी येथील न्यू मराठा संघाच्या कबड्डी स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याच यशस्वी घोडदौडीला पुढे नेत के.एल.ई. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या युवा क्रीडा महोत्सवात विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत महिला चॅम्पियनशिप चषकावर आपले नाव कोरले.

धावण्याच्या स्पर्धेत ताराराणीच्या खेळाडूंची बाजी

१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पल्लवी पाटील हिने प्रथम, प्रणाली पाटील हिने द्वितीय, तर नमिरा सनदी हिने तृतीय क्रमांक मिळविला. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अपेक्षा निलजकर हिने प्रथम, लक्ष्मी हंगिरकर हिने द्वितीय, तर साक्षी गुरव हिने तृतीय क्रमांक पटकावला.

४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत प्रणाली, पल्लवी, अपेक्षा आणि लक्ष्मी या चौघींनी उत्कृष्ट सांघिक समन्वय व वेगाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक मिळविला.

कबड्डीत प्रथम, थ्रो बॉलमध्ये द्वितीय क्रमांक

सांघिक कबड्डी स्पर्धेत कर्णधार दिव्या शिरोडकर हिच्या नेतृत्वाखाली पल्लवी आणि रेणुका गुरव यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर ताराराणीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. थ्रो बॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

प्रशिक्षक प्रशांत पांखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सपासून सांघिक खेळांपर्यंत प्रत्येक विभागात सातत्यपूर्ण कामगिरी करीत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी विशेष कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील, कबड्डी संघाला जर्सी उपलब्ध करून देणारे उद्योजक महेश पाटील, खानापूर तालुक्यातील उत्कृष्ट शरीरसौष्ठव प्रशिक्षक नितीन पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

महिला खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, ताराराणीच्या लेकींनी पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली चॅम्पियनशिप सिद्ध केली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us