खानापूर : हलशीवाडी- गुंडपीत ही उसाच्या फडाला आग! दोन दिवसात पाच ठिकाणी घटना!विद्युत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
खानापूर तालुक्यात विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून आगीच्या ठिणग्या!
दोन दिवसांत पाच ठिकाणी आगीच्या घटना; ऊस उत्पादक शेतकरी संकटात
खानापूर, पारिस्वाड क्रॉस आणि गुंडपी, हलशी-वाडी परिसरात ऊस पिकांचे नुकसान; विद्युत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
खानापूर लाईव्ह | प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे ऊस पिकांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी कानसुली, रामगुरवाडी आणि गणेबैल परिसरात सुमारे ४८ एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी खानापूरजवळील पारिशवाड क्रॉस आणि गुंडपी-हलशीवाडी परिसरात पुन्हा आगीच्या घटना घडल्या. यामध्ये दहा ते पंधरा एकरातील जरपूस जळून खाक झाला आहे.
पारिस्वाड क्रॉसजवळ ऊस पिकाचे नुकसान
मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास खानापूर-पारिस्वाड क्रॉसजवळील शेतकरी जोतिबा धाकलू घाडी यांच्या ऊस पिकात विद्युत ठिणगी पडल्याने आग लागली. उन्हाच्या तीव्रतेमुळे आग वेगाने पसरू लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
या घटनेनंतर भाजपचे नेते प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, संजय कुबल तसेच लैला साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी बाळासाहेब शेलार आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
गुंडपी-हलशीवाडीत ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या; ऊस जळून खाक
दरम्यान, दोन दिवसातील पाचवी घटना मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गुंडपी-हलशीवाडी परिसरातील शेतांमध्येही विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडाल्याने ऊस पिकाला आग लागली.
गुंडपी व हलशीवाडी परिसरातील सर्वे क्रमांक १६८ ते १७१ मधील शेतजमिनींच्या मधोमध दोन ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत. दुपारच्या सुमारास शेतीसाठी वीजपुरवठा सुरू होताच ट्रान्सफॉर्मरमधून मोठ्या प्रमाणात विद्युत ठिणग्या पडल्याने ऊस पिकाने पेट घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उन्हाच्या तीव्रतेमुळे आग वेगाने पसरू लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळच सागरे, नजीनकोडल येथील रोजगारासाठी आलेले शेकडो मजूर मदतीसाठी धावून आले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या मजुरांनी वेळीच धाव घेतल्यामुळे परिसरातील शेकडो एकरांतील ऊस पिकाचे संभाव्य मोठे नुकसान टळल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या आगीत अनेक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे :
- हुवाप्पा दामोदर अळवणी — गुंडपी
- पूजा प्रभाकर अळवणी — गुंडपी
- रोहन रामा देसाई — हलशीवाडी
- रामचंद्र लक्ष्मण देसाई — हलशीवाडी
- शंकर दत्तात्रय देसाई — हलशीवाडी
- महाबळेश्वर दत्तात्रय देसाई — हलशीवाडी
विद्युत विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
खानापूर तालुक्यात सलग दोन दिवसांत विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडून ऊस पिकांना आग लागण्याच्या घटना घडल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतांमधील ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या आणि संबंधित उपकरणांची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
ऊस हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक असून, त्यासाठी वर्षभर मेहनत, वेळ आणि मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. पीक तयार होण्याच्या टप्प्यावर आगीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार का?
खानापूर तालुक्यातील वाढत्या आगीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन विद्युत विभागाने ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतांची पंचनाम्याद्वारे पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरत असताना, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विद्युत विभाग कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे आगीच्या ठिणग्यामध्ये जळून खाक होणारे ऊस आता तोडणी कसे करावे हा प्रश्नही शेतकऱ्यासमोर आहे एकीकडे कारखानदारी उसाच्या दरावरून सुरू नाही त्यामुळे या आगीच्या उन्हाळ्यात जळालेल्या ऊस पिकाचे काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकला आहे .