खानापूर तालुक्यात भव्य ‘घरगुती मखर सजावट स्पर्धा २०२६’
खानापूर तालुक्यात भव्य ‘घरगुती मखर सजावट स्पर्धा २०२६’
तब्बल ₹७५ हजारांची बक्षिसे; शहरी व ग्रामीण विभागातील गणेशभक्तांना सहभागाची संधी

खानापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतीची आकर्षक मखर सजावट करणाऱ्या गणेशभक्तांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कल्पकतेला तालुकास्तरावर ओळख मिळावी, या उद्देशाने ‘खानापूरवार्ता’ आयोजित व लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर पुरस्कृत ‘घरगुती मखर सजावट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत शहरी आणि ग्रामीण असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी विविध बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार असून, दोन्ही विभागांसाठी मिळून तब्बल ₹७५ हजारांची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांच्या मखर सजावटीचे फोटो व व्हिडिओ ‘खानापूरवार्ता’च्या Instagram अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील गावागावांतील आकर्षक आणि कलात्मक मखर सजावटीला व्यापक प्रसिद्धी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, विजेत्यांची निवड केवळ लाईक, शेअर किंवा व्ह्यूजच्या आधारे केली जाणार नाही. मखर सजावटीची कल्पकता, कलाकुसर, आकर्षकता, पर्यावरणपूरकता, धार्मिक व सांस्कृतिक संदेश तसेच एकूण सादरीकरण या विविध निकषांचा विचार करून परीक्षक मंडळाकडून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व गणेशभक्तांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि कलाकौशल्याचे दर्शन घडवावे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरातील गणेशमूर्तीची आकर्षक मखर सजावट संपूर्ण तालुक्यापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळवावी, असे आवाहन **‘खानापूरवार्ता’**कडून करण्यात आले आहे.