Home » खानापूर तालुक्यातील ६२ गावे ‘ईएसझेड’मधून वगळण्याची मागणी

खानापूर तालुक्यातील ६२ गावे ‘ईएसझेड’मधून वगळण्याची मागणी

file_000000006f348211b83b52b8ab74c20a

खानापूर तालुक्यातील ६२ गावे ‘ईएसझेड’मधून वगळण्याची मागणी

म. ए. समितीचे उद्या तहसीलदारांना निवेदन; कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

खानापूर : पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ESA) संदर्भातील सातव्या अधिसूचनेत खानापूर तालुक्यातील ८५२ चौ. कि.मी. क्षेत्रातील ६२ कंदाय गावांचा समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने याला आक्षेप नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

या ६२ गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या जाचक अटींतून वगळावे, या मागणीसाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता खानापूर तहसीलदारांना अधिकृत आक्षेपाचे निवेदन देण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर समितीच्या मध्यवर्ती कार्यालयातून कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ESAच्या निर्णयामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या जमीनविषयक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता असून, रस्ते व अन्य मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या विषयावर तालुक्यातील जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.

📍 निवेदनाचा कार्यक्रम

स्थळ : राजा शिवछत्रपती स्मारक, खानापूर
वेळ : सकाळी १० वाजता
दिनांक : २५ सप्टेंबर २०२६

निवेदनासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, मध्यवर्ती व युवा समितीचे पदाधिकारी, गावागावातील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us