file_00000000c694720b8fdee650b492374c

खानापूर : प्रतिनिधी


खानापूर तालुक्यातील हलसी ते मडवाळ या मार्गावरील नाल्याजवळ रस्त्याचा कडा खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या एका बाजूचा मोठा भाग खचला असून, आणखी पाऊस झाल्यास वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
या ठिकाणी मागील वर्षीही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मोठी पडझड झाली होती. आता पुन्हा उलट बाजूने रस्ता खचत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाल्याच्या काठावर असलेल्या या अरुंद रस्त्यावरून हलसी, मडवाळ, देवराई, घोटगाळी, रेडेकुंडी, तारवाड, शिवठाण, घोटगाडी, रंजनकोंडीसह दहाहून अधिक गावांचा दळणवळणाचा संपर्क आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून, रस्त्याच्या पायाभूत भागाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अरुंद रस्त्यामुळे वाढला धोका
हलसी ते देवराई हा रस्ता नाल्याच्या कडेला आणि शेतवडीतून जात असल्याने दोन्ही बाजूंनी पाण्याचा मोठा प्रवाह येतो. त्यामुळे दरवर्षी या रस्त्याला नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करून कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात येत आहे. मात्र, केवळ तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने समस्या कायम आहे.
“या मार्गाचे रुंदीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरवर्षी तात्पुरत्या दुरुस्तीवर भर दिला जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.”
— बाबा देसाई, सामाजिक कार्यकर्ते, मलवाड
खानापूर लाईव्ह
तालुक्यातील वेगवान आणि विश्वसनीय वेबसाईट
संपादक : पिराजी कुऱ्हाडे
संपर्क : 9481654453

Do Share
error: Content is protected !!
Call Us