Home » चापोली–चिरेखानी परिसरात हत्तींचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

चापोली–चिरेखानी परिसरात हत्तींचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Screenshot_2026-09-25-10-29-18-21_96b26121e545231a3c569311a54cda96

चापोली–चिरेखानी परिसरात हत्तींचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

खानापूर लाईव्ह / प्रतिनिधी :

चापोली–चिरेखानी परिसरात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना, दुसरीकडे हत्तींच्या कळपाने शेतात घुसून कष्टाने जोपासलेली भात पिके जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

चापोली–चिरेखानी परिसरातील मल्लाप्पा हनबर, मधू पांडुरंग गुरव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून सात ते आठ हत्तींच्या कळपाने ठाण मांडले आहे. हत्ती शेतात घुसून भात पिकांची नासधूस करत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भात पिके जगवली. मात्र, ऐन पीक तयार होण्याच्या काळात हत्तींचा कळप शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

वन खात्याकडून ठोस उपाययोजनांची मागणी

हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन खात्याने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष शेतात उतरून हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हत्तींचा कळप शेतात येऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

“वन्यप्राण्यांपासून आम्हाला संरक्षण द्या, आमची पिके वाचवा,” अशी आर्त हाक चापोली–चिरेखानी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभाग व शासनाकडे केली आहे.

एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या

हत्तींच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या भात पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी. नुकसानभरपाई म्हणून शासनाने किमान एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थिती, वाढता वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि शेतीचे नुकसान या तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us