खानापूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. बेळगाव येथील आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीची तयारी जिल्हा निवडणूक आयोगाने केली असून चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. दी.10 मे रोजी झालेल्या निवडणुकीत तालुक्यात चुरशीने मतदान झाले.यामध्ये जनशक्ती, धनशक्ती, मराठी अस्मिता, विकासाचे गाजर अशा अनेक आशा वादात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. अन् गेले 15 दिवस खानापूर तालुका ढवळून निघाला. प्रचाराची रणधुमाळी जोरात झाली. अन् 13 उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत झाले आहे. आता उत्सुकता लागली आहे ती निकालाची.
उमेदवार म्हणतात… गुलाल आमचाच,
खानापूर विधानसभा मतदार क्षेत्र हे समितीचा बालेकिल्ला संबोधले जाते. पण या बालेकिल्लाला सुरुंग लागल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीला मागील निवडणुकीत ग्रहण लागले, ते भरून काढण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने एकीची वज्रमुठ राखत या निवडणुकीत लढा दिला आहे. जेव्हा, जेव्हा म. ए.समिती एकीचे झेंड्याखाली येते, तेव्हा समितीचा विजय होतो. त्यामुळे मराठी मतदार पुन्हा समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना निवडून देतील असा आशावाद समिती नेत्यांनी ठेवून गुलाल आमचाच…. असा दावा केला आहे.
पण राष्ट्रीय पक्षांच्या जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा वापर झाल्याने कुठेतरी स्वाभिमानाला तडा जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत खानापूर तालुक्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने भाजपाने रणनीती आखली. तर काँग्रेसने विकासाच्या जोरावर खानापूर तालुक्यात पुन्हा आम्हीच असा दावा केला आहे. तर निधर्मी जनता दलाच्या उमेदवारानेहि धनशक्तीचा वापर करत मतदारांना आकर्षित करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे हे तीनही उमेदवार गुलाल आमचाच.. या अविर्भावात आहेत.
खरं तर, खानापूर तालुक्यात आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मागील निवडणुकीत नारीशक्तीच्या आधारावर सत्तेचे गणितच बदलून टाकले. आणि गेल्या पाच वर्षात खानापूरचा आवाज कर्नाटकच्या विधानसभेत गाजवला. पण सत्तेच्या राजकारणात विकासाचे गणित मात्र कुठेतरी कोलमंडले, आणि येणारा निधी वाटेतच थांबला. त्यामुळे शेवटी आम्ही काय करू? असा विचार करण्याची वेळ विद्यमान आमदारांच्यावर आली. मात्र यावेळीही त्यांनी केलेल्या विकासाचा जोर दाखवत प्रचारात जोरात मुसंडी मारत जंग जंग पछाडून तालुक्यातील महिलांना पुन्हा एकदा आकर्षित करून काँग्रेसच्या असलेल्या ‘बँक होट ‘ची ताकत समोर ठेवून गूलाल आमचाच.. असा आशावाद ठेवला आहे.
तर इकडे भारतीय जनता पार्टीने देखील खानापूर तालुक्यात प्रचारात आघाडी घेत यावेळी गुलाल आमचाच…. असा ठाम विश्वास व्यक्त केला. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या, शैक्षणिक समस्या दूर करण्यात कायम आघाडी घेतली. त्यामुळे एक लोक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजपच्या वरिष्ठांनीही खानापुरात कार्याची दखल लक्षात घेता अनेक मातब्बर उमेदवार बाजूला ठेवून विठ्ठल हलगेकर यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे. व माजी आमदार अरविंद पाटील यांचीही ताकद यावेळी पणाला लागली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गुलाल आमचाच….. असा दवा केला आहे. तालुक्यात भाजपाची मोठी फळी आहे. प्रत्येक गावात मतदानाची चांगली मांडणी करत साम, दाम, दंड वापरून कार्यकर्त्यांना एकत्रित करून मताची टक्केवारी वाढवली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ठाम विश्वास निर्माण झाला असून यावेळी गुलाल आमचाच… असा दावा त्यांनीही केला आहे.
ना’सिर बागवान… म्हणतात म्हैच आऊंगा !
खानापूर तालुक्यात 2013 पूर्वी निधर्मी जनता दलाचे नावही नव्हते. पण गेल्या दोन निवडणुकात निधर्मी जनता दलाचे उमेदवार नासिर बागवान यांनी चांगलीच मुसंडी मारली. 2018 च्या निवडणुकीत त्यांनी 28 हजार मते घेतली. यावेळी ही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात येऊन डबल मताधिक्य घेऊन गुलाल आमचाच…. म्हैच आऊंगा! असा दावा त्यांनीही केला आहे.
याशिवाय शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेले श्रीमान के पी पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार इरफान तालिकोटी यांनीही खानापूर तालुक्यात प्रचारात आघाडी घेत हम भी किसीसे कम नही! असे म्हणत गुलाल आमचाच… असा दावा केला आहे. एकूणच विजयी उमेदवारांचे मताधिक्य किती राहणार व पराभूत उमेदवाराला कोण कारणीभूत ठरणार? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
एकूणच खानापूर तालुक्यात 1,60,093 येथे मतदान झाले आहे. शिवाय पोस्टेड मतदान आहे. या एकूण मतदानात 50 हजार पर्यंत कोण मतदान घेणार तोच विजयी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खानापूर तालुक्यात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. युवा मतदार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार परिवर्तनाच्या दिशेने की सत्ताधिकाऱ्यांच्या दिशेने कौल देणार याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.