इदलहोंड: तालुक्याचा विकास हा समितीच्या आमदारांनीच केला आहे. विरोधक समितीने काय केले असा प्रश्न विचारीत आहेत. खऱ्या आता विकासाच्या नावाखाली नुसती बजबजपुरी माजली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात पैशाचे वजन ठेवल्याशिवाय गोरगरिबांची कामं होत नाहीत. दलालांनी शासकीय कार्यालये काबिज केली आहेत. आम्ही मराठी भाषा टिकविण्याबरोबरच आमच्या मराठी माणसांच्या भल्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. तालुक्यातील जनता आजच्या घडीला समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या पाठीशी का उभी आहे? राष्ट्रीय पक्षांची आमिषे आणि त्यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. त्या भ्रष्ट विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची ही सुवर्णसंधी आहे. मतदारांनी समितीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करून पुन्हा तालुका भ्रष्टाचारमुक्त करावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले.
शनिवारी इदलहोंड येथे समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांची जंगी प्रचार रॅली आणि सभा झाली. यावेळी संपूर्ण गाव एकवटले होते. तसेच गावात भगवेमय वातावरण होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील होते. सभेला उमेदवार मुरलीधर पाटील यांच्यासह गोविंद जाधव, संदिप पाटील, सागर पाटील, मनोहर जाधव, डॉ.एल.एच.पाटील, रमेश देसाई, यशवंत पाटील, मारूती पाटील, मोहन जाधव, संतोष देसाई, विनायक डिचोलकर, विशाल पाटील, भाऊराव पाटील, विनायक पाटील, जोतिबा पाटील, जाधव,विनायक पाटील, नागेश पाटील, रमेश पाटील, विलास पाटील, दिपा पाटील, रमा लोहार, शुभा पाटील, अनुपमा पाटील, सुनिता चोपडे, विद्या पाटील, शंकर पाखरे यांच्यासह सन्नी युथ क्लब, श्रीराम सेना आणि म.ए.समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इदलहोंड गावाने सीमालढ्यात मोठे योगदान दिले आहे. साराबंदीसारख्या आंदोलनातील इदलहोंडचे योगदान अविस्मरणीय आहे. प्रत्येक निवडणुकीत या गावातून समितीला भरघोस मतदान मिळाले आहे. राष्ट्रीय पक्षांनी इदलहोंडमधील मते मिळविण्यासाठी जिवाचे रान केले असले तरी यावेळी समितीचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी संपूर्ण गाव एकवटला आहे. त्यामुळे मुरलीधर पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मत दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या पाच वर्षात तालुक्याने वनवास भोगला आहे. समितीच्या सत्तेशिवाय सर्वसामान्य जनतेचे भले होणार नाही याची प्रचिती तालुकावासीयांना आली आहे. इदलहोंडवासीय नेहमीच समितीसोबत राहिले आहेत. यावेळी १०० टक्के मतदान समितीला करून इतिहास रचला जाणार आहे. कारण, आम्ही हेवेदावे विसरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी गावातून एकाही मताची आपेक्षा करू नये, असे गोविंद जाधव यांनी सांगितले.
उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले, मी केवळ समितीचे प्रतिक आहे. आतापर्यंत सीमाप्रश्नाच्या लढ्यात जेवढे म्हणून योगदान देता येईल, त्यात कधीच तडजोड केली नाही. त्यामुळेच समितीने यावेळी मला तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला. आता तालुक्यातील मतदारांनी आपले बहुमोल मत देऊन त्यांची जबाबदारी पार पाडावी, अशी विनंती मतदारांना केली. यावेळी ग्रामस्थांनी मुरलीधर पाटील यांना एकमुखी पाठींबा जाहीर करून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रारंभी गावातील प्रत्येक गल्लीतून प्रचार रॅली काढून मतदानाचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सभा झाली. प्रसंगी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विरोधकांना हद्दपार करण्याचा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्त केला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.