सौंदती: यल्लामा देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना धारवाड नजीक टेम्पोचा समोरील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तिघे जण जखमी तर आणि काही किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.
या अपघातात ठार झालेल्या भाविकाचे नाव अर्जून केदारी जुवेकर व 45 (रा गोधोळी) असे आहे. तर त्याचाच भाऊ दत्ताराम केदारी जुवेकर याला गंभीर मार लागला आहे. शिवाय आणखी 3 जण जखमी झाले असून त्यांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहितीची गोधोळी येथील जुवेकर कुटुंबात चार दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला होता. नववधूसह कुटुंबातील जवळपास 15 जण एका 407 टेम्पो मधून यल्लामा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बेळवडी ते धारवाड दरम्यान कलगेरी नजिक टेम्पोचा समोरील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व रस्त्याकडेला वाहनाने दोन-तीन पलट्या घेतल्या. यामध्ये पाठीमागे फाळक्यावर बसलेले अर्जून केदारी जुवेकर हे जागीच ठार झाले. तर दत्ताराम जुवेकर यांच्या मानेला जवळ मार बसला आहे. उर्वरित तिघाना गंभीर दुखापत झाली असून त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याचे कळते. अर्जुन जुवेकर हे गोवा तिस्का येथे कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आठवड्या भरवापूर्वी गावातील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने तिघांना चिरडल्याने मोठा अपघात घडला होता. त्यानंतर गावातील ही दुसरी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.