Home » नंदगड परिसरात म. ए. समितीकडून महामेळाव्याची जनजागृती!

नंदगड परिसरात म. ए. समितीकडून महामेळाव्याची जनजागृती!

IMG-20261125-WA0112

नंदगड परिसरात म. ए. समितीकडून महामेळाव्याची जनजागृती!

‘चलो बेळगाव’चा नारा देत मराठी बांधवांना महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

नंदगड : प्रतिनिधी

बेळगाव येथे बुधवार, दि. २ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या सीमावासियांच्या निषेधात्मक महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नंदगड परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी पत्रके वाटून मराठी बांधवांना महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘चलो बेळगाव’चा नारा देत सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.

कर्नाटक सरकारकडून २००६ पासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत आहे. सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अधिवेशन भरविण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निषेधात्मक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महामेळावा होणार असून, धर्मवीर संभाजी चौक, संभाजी उद्यान शहापूर, व्हॅक्सिन डेपो मैदान किंवा सरदार हायस्कूल मैदान यापैकी निश्चित करण्यात येणाऱ्या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजनसिंह सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर, सहचिटणीस रणजीत पाटील आणि उपखजिनदार पांडुरंग सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि मराठी भाषिकांच्या एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी २ डिसेंबर रोजी बेळगाव येथील महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

खानापूर लाईव्ह

Do Share
error: Content is protected !!
Call Us