Home » Khanapur : आरक्षण ५० टक्के, पण महिला नेतृत्वाचा दुष्काळ?ಶೇಕಡಾ 50ರಷ್ಟು ಮೀಸಲಾತಿ, ಆದರೂ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಕೊರತೆ?

Khanapur : आरक्षण ५० टक्के, पण महिला नेतृत्वाचा दुष्काळ?ಶೇಕಡಾ 50ರಷ್ಟು ಮೀಸಲಾತಿ, ಆದರೂ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಕೊರತೆ?

file_0000000033c082119e09c9716294d514

आरक्षण ५० टक्के, पण महिला नेतृत्वाचा दुष्काळ?

खानापूरच्या राजकारणात अनुभवी महिला पुन्हा सक्रिय होणार की राजकीय नेत्यांच्या घरातील महिलांना मिळणार संधी?

खानापूर :

खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी महिला आरक्षणाचा टक्का ५० टक्क्यांवर पोहोचला असला, तरी त्या तुलनेत सक्षम, स्वतंत्र आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या महिला नेतृत्वाची उपलब्धता हा चर्चेचा विषय बनला आहे. आरक्षणामुळे महिलांसाठी राजकारणाची दारे खुली झाली असली, तरी या संधीचा लाभ घेऊन प्रत्यक्ष राजकीय नेतृत्व करण्यासाठी किती महिला पुढे येणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खानापूर तालुका पंचायतच्या २० मतदारसंघांपैकी १० मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर जिल्हा पंचायतच्या सहा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ महिलांसाठी राखीव असल्याचे यापूर्वीच्या आरक्षण यादीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात महिला उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मात्र, खानापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, तालुकास्तरावर स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केलेल्या महिला नेतृत्वाची संख्या तुलनेने मर्यादित असल्याचे चित्र दिसते.

तालुक्यातील प्रमुख महिला नेतृत्व

काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यात महिला नेतृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर भाजपच्या राज्य कार्यकारिणी सचिव धनश्री सरदेसाई-जांबोटीकर याही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून महिलांचे नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक आहेत.

याशिवाय यापूर्वी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या महिला सदस्यांचीही मोठी परंपरा खानापूर तालुक्यात आहे.

माजी तालुका पंचायत सदस्य धनश्री सरदेसाई, राजश्री सरदेसाई, वासंती बडगेर, नम्रता कापोलकर तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य अंजना देसाई, लक्ष्मी गोपाळ पाटील, पार्वती पाटील आणि सुप्रिया कुट्रे, यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

या महिला प्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कामाचा अनुभव घेतला आहे. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्य म्हणून काम केलेल्या अनेक महिला त्यांच्या कार्यक्षेत्रात आरक्षण आल्यास पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अनुभवी महिला पुन्हा सक्रिय होणार की नव्या चेहऱ्यांना संधी?

आगामी निवडणुकीत धनश्री सरदेसाई, राजश्री सरदेसाई आणि अंजना देसाई यांच्यासारख्या राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिला पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात उतरतात का, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, तालुक्यातील विविध राजकीय पक्षांमधील सक्रिय नेते, पदाधिकारी आणि स्थानिक राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिला प्रतिनिधींनाही निवडणुकीत उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही मतदारसंघांत अनुभवी महिला नेतृत्व विरुद्ध नव्या महिला चेहऱ्यांची अशी राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

आरक्षणामुळे महिला नेतृत्व खऱ्या अर्थाने घडणार का?

महिला आरक्षण म्हणजे केवळ निवडणूक लढविण्यासाठी जागा राखीव ठेवणे नव्हे, तर महिलांना निर्णयप्रक्रियेत स्वतंत्र सहभाग, विकासकामांमध्ये पुढाकार आणि जनतेच्या प्रश्नांवर नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देणे होय.

खानापूर तालुक्यातील महिला आरक्षणामुळे राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. मात्र, उमेदवारी देताना केवळ राजकीय घराण्याचा प्रभाव न पाहता सामाजिक कार्य, जनसंपर्क, नेतृत्वक्षमता आणि विकासकामांचा अनुभव यांनाही महत्त्व दिले जाणार का, हा चर्चेचा मुद्दा आहे. गर्ल गुंजी जांबोटी नंदगड ककक्केरी परिषवाड या पाचही जिल्हा पंचायत क्षेत्रात

एकीकडे ५० टक्के आरक्षणामुळे महिलांसाठी राजकीय संधींचे नवे दालन खुले झाले आहे, तर दुसरीकडे त्या संधीचा लाभ घेऊन स्वतंत्र नेतृत्व निर्माण करण्याचे आव्हानही उभे राहिले आहे.

खानापूरच्या राजकारणात अनुभवी महिला पुन्हा मैदानात उतरणार की नव्या राजकीय कुटुंबांतील महिलांना संधी मिळणार? ५० टक्के महिला आरक्षण प्रत्यक्षात सक्षम महिला नेतृत्व घडविणार का? आगामी निवडणुकीत याचे उत्तर मिळणार आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us