आरक्षणाचा फैसला झाला; आता उमेदवारीची रणधुमाळी!
आरक्षणाची प्रतीक्षा संपली; आता निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष!
जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका दावणीला; बेळगाव जिल्ह्यात ९० तर खानापूर तालुक्यात २० जागा
आरक्षण जैसे थे; इच्छुकांची उत्सुकता शिगेला, भाजप-काँग्रेस-महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू!
खानापूर : प्रतिनिधी
जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या आरक्षणाची प्रतीक्षा संपली असून आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे. बेळगाव जिल्हा पंचायतच्या ९० जागांसाठी, तर खानापूर तालुका पंचायतच्या २० जागांसाठी निवडणुकीचे पडघम वाजण्याची प्रतीक्षा आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
खानापूर तालुक्यात भाजप हा सध्या सर्वात मोठा राजकीय पक्ष मानला जात असला तरी काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीही निवडणुकीच्या तयारीत मागे नाहीत. भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून उमेदवारी मिळविण्यासाठी अंतर्गत स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे आहेत. सहाही जिल्हा पंचायत क्षेत्रांतील आरक्षणामुळे काही इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काहींना निराशेला सामोरे जावे लागले आहे.
सहा जिल्हा पंचायत क्षेत्रांचे आरक्षण काय?
खानापूर तालुक्यातील सहा जिल्हा पंचायत क्षेत्रांच्या आरक्षणात २०१८ च्या तुलनेत काही प्रमाणात बदल झाला आहे.
जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रात यावेळीही सर्वसाधारण आरक्षण कायम राहिले आहे. गर्लगुंजी आणि लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले आहे. नंदगडमध्ये अ वर्ग महिला आरक्षण आले आहे. तर परिशवाडमध्ये अनुसूचित जाती महिला आणि कक्केरीमध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण निश्चित झाले आहे.
२०१८ च्या आरक्षणाशी तुलना करता जांबोटीमध्ये सर्वसाधारण आरक्षण कायम आहे. गर्लगुंजीत अ वर्ग आरक्षणाऐवजी सर्वसाधारण महिला आरक्षण आले आहे. नंदगड आणि लोंढा क्षेत्रांत आरक्षणाच्या प्रवर्गात बदल झालेला नाही. परिशवाडमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाऐवजी अनुसूचित जाती महिला, तर कक्केरीत अनुसूचित जमातीऐवजी अनुसूचित जमाती महिला आरक्षण आले आहे.
जांबोटीत भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ!
जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रात सर्वसाधारण आरक्षण आल्याने या ठिकाणी भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. भाजपमधील अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत असून पक्ष कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती कोणाला उमेदवारी देणार, याचीही उत्सुकता आहे.
लोंढ्यात अंजना देसाई की राजश्री देसाई?
लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने विद्यमान सदस्य अंजना देसाई यांच्यासह राजश्री विनय देसाई यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपचे बाबुराव देसाई आपल्या पत्नीची उमेदवारी कायम ठेवणार की अन्य इच्छुकाला संधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
गर्लगुंजीत आमदार हलगेकरांची कसोटी!
गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्र हे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. येथे सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीही या क्षेत्रात संधीच्या प्रतीक्षेत असून भाजपमधील नाराज इच्छुकांवर तिचे लक्ष असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
नंदगडचा गड भाजप राखणार की २०१८ ची पुनरावृत्ती?
नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात अ वर्ग महिला आरक्षण आल्याने भाजपसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीवरील संघर्षाचा फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला झाला होता. त्यावेळी सुप्रिया कुट्रे यांनी विजय मिळवला होता.
मागील निवडणुकीत भाजपमधील उमेदवारीचा पेच, प्रमाणपत्रासंदर्भातील आक्षेप आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या घडामोडींमुळे पक्षाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अखेरीस भाजपला अधिकृत उमेदवार निवडण्यात अपयश आल्याने नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे यावेळी भाजप मागील अनुभवातून धडा घेऊन योग्य उमेदवाराची निवड करणार का? नंदगडचा गड पुन्हा मिळवणार का? की महाराष्ट्र एकीकरण समिती आपले वर्चस्व कायम ठेवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
परिशवाड-कक्केरीत इच्छुकांची संख्या वाढली!
परिशवाड आणि कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रांत अनुक्रमे अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती महिला आरक्षण निश्चित झाल्याने या प्रवर्गातील इच्छुक महिलांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. या दोन्ही क्षेत्रांत भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. नेमकी कोणाला उमेदवारीची लॉटरी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाराजांची भूमिका ठरणार निर्णायक!
एकूणच खानापूर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असली तरी काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीही निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहेत. भाजपमधील उमेदवारीवरून निर्माण होणारी नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडू शकते. योग्य उमेदवाराची निवड, स्थानिक समीकरणे आणि नाराज इच्छुकांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा निवडणूक कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. उमेदवारी निश्चित होताच खानापूर तालुक्यातील राजकीय संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.