वाळू आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा!
वाळू आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा!
सोमवारी सकाळी ११ वाजता शिवस्मारक चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील वाळू व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) विविध संघटना आणि वाळू व्यावसायिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, चिटणीस आबासाहेब दळवी तसेच समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील जनतेला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारक चौकात सर्वांनी एकत्र जमून आंदोलनात सहभागी व्हावे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात वाळू व्यवसाय बंद असल्याने त्याचे गंभीर परिणाम विविध क्षेत्रांवर होत आहेत. वाळू टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची घर बांधण्याची स्वप्ने अपूर्ण राहत आहेत. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून वीट व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. याचा परिणाम खानापूरच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर होत आहे.
दुसरीकडे, वाळू वाहतुकीसाठी टिप्पर व ट्रक खरेदी केलेल्या मालकांवर कर्जाचे ओझे वाढत आहे. व्यवसाय बंद असल्याने वाहनांचे हप्ते भरण्यासाठी उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. त्यामुळे वाहनमालक आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वाळू व्यवसायाला कायदेशीर परवानगी देऊन तो तातडीने सुरू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्याच्या आर्थिक विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकामाच्या प्रश्नासाठी होणाऱ्या या आंदोलनात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.