Home » मलवाड सह २४ खेड्यांच्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला वेग!

मलवाड सह २४ खेड्यांच्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला वेग!

Screenshot_2026-11-13-21-31-30-21_96b26121e545231a3c569311a54cda96

मलवाड सह २४ खेड्यांच्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला वेग!

२५ वर्षांनंतर २१ एप्रिल २०२७ पासून भव्य यात्रोत्सव; देवीच्या नावाने घराणा घालून पाच वार पाळण्याचा निर्णय

खानापूर : मलवाड , कापोलीसह परिसरातील २४ खेड्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या भव्य यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर २४ गावांच्या एकत्रित सहभागातून यात्रोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थ, भाविक व कार्यकर्त्यांच्या एकमताने घेण्यात आला आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवीच्या नावाने घराणा घालून पाच वार पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात शुक्रवार आणि मंगळवार हे वार विशेष महत्त्वाचे असणार आहेत. येत्या २७ नोव्हेंबर रोजी वारांची समाप्ती होणार असून, त्याच दिवशी ओट्या भरण्याच्या विधीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.

यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी वतनदार तसेच दोन प्रमुख इनामदार श्री. मनोहर गणपतराव देसाई आणि श्री. शिवाजी गुणाजी देसाई यांच्यासह प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत यात्रेच्या धार्मिक परंपरा, वार पाळण्याची पद्धत आणि पुढील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

याच अनुषंगाने शुक्रवारी कुट्टी माऊली देवस्थान येथे २४ गावांतील प्रमुख पंचमंडळी, हक्कदार व मान्यवरांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून नवस सोडण्याचा धार्मिक विधी पार पडला. या विधीमुळे यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

२१ एप्रिल २०२७ पासून मलवाड येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नऊ दिवसांचा भव्य यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. २४ गावांतील भाविक, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या सहभागातून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडण्याची अपेक्षा आहे.

२५ वर्षांनंतर होणाऱ्या या ऐतिहासिक यात्रोत्सवामुळे संपूर्ण २४ गावांच्या परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेची भाविक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

खानापूर लाईव्ह

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us