खानापुरात १४ नोव्हेंबरला तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन!
श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन
खानापुरात १४ नोव्हेंबरला तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन
श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन
खानापूर : कर्नाटक शासनाच्या पदवीपूर्व शिक्षण विभाग, बेळगाव जिल्हा आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील खानापूर तालुकास्तरीय विभागीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता खानापूर येथील श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील माणिकराव देशपांडे सभागृहात या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. चेतन ए. मानेरीकर असणार आहेत. खानापूरचे आमदार विठ्ठलराव एस. हलगेकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक श्री. एम. एम. कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुहास व्ही. कुलकर्णी, बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष श्री. एम. के. भजंत्री तसेच बेळगाव जिल्हा प्राचार्य व्याख्याता संघटनेचे अध्यक्ष डॉ. एन. बी. मरेंनावर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळावे तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्यातील विविध पदवीपूर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, कर्मचारी व सचिव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
खानापूर लाईव्ह