Home » खानापूर: तालुक्यात वीज वाहिन्यांचा शॉर्टसर्किटचा कहर! ऊस पिकांचे नुकसान! खानापुरातही घटना!

खानापूर: तालुक्यात वीज वाहिन्यांचा शॉर्टसर्किटचा कहर! ऊस पिकांचे नुकसान! खानापुरातही घटना!

खानापूर तालुक्यात वीज वाहिन्यांचा शॉर्टसर्किटचा कहर!

दोन दिवसांत चार ठिकाणी ऊस पिकांना आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सोमवारी कानसुली, रामगुरवाडी आणि गणेबैल-काटगाळी परिसरात ऊस पिकांना आग लागून जवळपास ४८ एकरांतील ऊस जळून खाक झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, मंगळवारी सकाळी खानापूर शहरानजीक पारिशवाड क्रॉसजवळ पुन्हा शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाचे नुकसान झाले.

पारिशवाड क्रॉसजवळ २० टन ऊस जळाला

खानापूर येथील शेतकरी ज्योतिबा धाकलू घाडी यांच्या उसाच्या फडाला मंगळवारी सकाळी वीज वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत त्यांचे जवळपास २० टन ऊस पिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कष्टाने वाढविलेल्या ऊस पिकाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी लैला साखर कारखान्याचे शेतकरी बाळाराम शेलार, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वीज वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

खानापूर तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत चार ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकांचे नुकसान झाल्याच्या घटनांमुळे वीज वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज वाहिन्यांची तपासणी करून संभाव्य धोके वेळीच दूर करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

📰 खानापूर लाईव्ह | स्थानिक बातम्या, वेगवान अपडेट्स!

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us