Home » बाबुराव देसाई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!

बाबुराव देसाई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!

file_00000000992882118c5e245c02c84148

जांबोटी जिल्हा पंचायतमधून बाबुराव देसाई यांच्या उमेदवारीची चर्चा; लोंढा विभागातून पत्नी अंजना देसाई यांनाही संधी?

खानापूर / प्रतिनिधी :

खानापूर तालुक्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जांबोटी जिल्हा पंचायत विभागातून माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव गोविंदराव देसाई यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जांबोटी विभागात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी निर्माण झाली आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी व लोंढा विभागाच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य अंजना देसाई यांच्यासाठीही महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय संधीची चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय प्रवासाची सुरुवात बजरंग दलातून!

बाबुराव गोविंदराव देसाई हे मूळचे वडगाव-जांबोटी येथील रहिवासी असून, व्यवसायाच्या निमित्ताने ते लोंढा येथे स्थायिक झाले. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार करत त्यांनी खानापूर तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

सन 2000 च्या आसपास त्यांच्या नावाची तालुकाभर चर्चा होती. संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले. सन 2005 मध्ये जांबोटी जिल्हा पंचायत विभागातून विजय मिळवत त्यांनी त्या परिसरात भाजपचा प्रभाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जांबोटीपासून लोंढ्यापर्यंत राजकीय प्रभाव!

खानापूर तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीत बाबुराव देसाई यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तालुकाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले. आमदारकीच्या दावेदारांमध्येही त्यांच्या नावाची वेळोवेळी चर्चा होत राहिली. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना आमदारकीपर्यंत पोहोचता आले नाही.

दुसरीकडे, लोंढा विभागात त्यांच्या पत्नी अंजना देसाई यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. त्यामुळे जांबोटी आणि लोंढा या दोन्ही भागांत देसाई कुटुंबाची राजकीय ओळख निर्माण झाली आहे.

जांबोटीतून उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह!

आगामी निवडणुकीत जांबोटी जिल्हा पंचायत विभागातून भाजपने बाबुराव देसाई यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे चित्र आहे. ‘बाबुराव देसाई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!’ अशा घोषणांमधून कार्यकर्ते आपली भूमिका मांडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जांबोटी विभागात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने देसाई यांच्या उमेदवारीच्या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असल्याचा राजकीय वर्तुळातील अंदाज आहे. जांबोटी विभाग तसा समितीचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे या ठिकाणी आजही समितीची पकड आहे. त्याला केवळ बाबुराव देसाई हे कडवी झुंज देऊन या भागात पुन्हा भाजपचा झेंडा अटकेपार करू शकतात असा आशावाद आहे.

भाजपसमोर उमेदवारी निवडीचे आव्हान!

जांबोटी विभागातून बाबुराव देसाई यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. माजी तालुका पंचायत सदस्य धनश्री सरदेसाई, भाजपचे माजी प्रधान कार्यदर्शी मारुती पाटील (उचवडे), नारायण कालमणकर (देवाचीहट्टी), लक्ष्मण झांजरे (बैलूर), माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई (नेरसा), पवन गायकवाड (बैलूर) आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांची नावेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह तालुका कोअर कमिटीसमोर उमेदवारी निश्चित करताना इच्छुकांमध्ये समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे.

निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष!

जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाकडून अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. आरक्षणानुसार निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्यास जांबोटी आणि लोंढा या दोन्ही विभागांतील राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त होणार आहे.

एकीकडे जांबोटी विभागातून बाबुराव देसाई यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा, तर दुसरीकडे लोंढा विभागातून अंजना देसाई यांच्या नावाची शक्यता यामुळे खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अखेर भाजप नेतृत्व कोणाला संधी देते आणि इच्छुकांमधील स्पर्धेत कोण बाजी मारतो, याकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us