आलेहोळ शाळेचे शिक्षक परशराम शिंदे यांच्या कलागुणांचा शिवोली येथे गौरव ! कवी मनातील सुरेल गाण्यांचा आविष्कार ; स्वर-संगीताच्या तालावर गीतांची निर्मिती!
आलेहोळ शाळेचे शिक्षक परशराम शिंदे यांच्या कलागुणांचा शिवोली येथे गौरव
कवी मनातील सुरेल गाण्यांचा आविष्कार; स्वर-संगीताच्या तालावर गीतांची निर्मिती
आलेहोळ शाळेचे शिक्षक परशराम शिंदे यांच्या कलागुणांचा शिवोली येथे गौरव
खानापूर / प्रतिनिधी : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात. मात्र, या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले तर त्यातून उत्तम कलाकार, साहित्यिक, कवी, गीतकार आणि गायक घडू शकतो. आपल्या मनातील कलागुण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आलेहोळ शाळेचे सहशिक्षक परशराम शिंदे यांच्या संगीत व गीतलेखन क्षेत्रातील कार्याचे कौतुक होत आहे.
शिवोली येथील मराठी प्राथमिक शाळेत चापगाव सीआरपी अंतर्गत शिक्षकांची बैठक झाल्यानंतर परशराम शिंदे यांच्या गौरव-सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार पिराजी कुऱ्हाडे बोलत होते.
कुऱ्हाडे म्हणाले, “शिक्षक म्हणून सेवा बजावत असतानाच आपल्या अंगातील कलागुणांचा समाजासाठी उपयोग करून घेणे ही कौतुकास्पद बाब आहे. कवी, लेखक, गायक किंवा कलाकारांच्या कलाकृतींना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. परशराम शिंदे यांनी आपल्या स्वरचित गीतांना सुरेल संगीताची जोड देत केलेली निर्मिती ही निश्चितच प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा जांबोटकर होत्या. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम सनदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी सरस्वती मातेचे पूजन बेळगाव जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष महादेव दळवी, पंच कमिटीचे प्रमुख व ज्येष्ठ कलाकार हनुमंत नागेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक नारायण जांबोटकर, यांच्या हस्ते झाले.
संपन्न व्यक्ती फारुख मुल्ला, चापगाव शाळेचे मुख्याध्यापक एन. बी. पाटील, चापगाव कन्नड शाळेचे मुख्याध्यापक सुनगार मुख्याध्यापक महादेव बांदिवडेकर, आलेहोळ शाळेचे मुख्याध्यापक नागराज इंचल, लालवाडी रामा हुलीकोतल, कारलगा उत्तूरकर व हेब्बाळहट्टी आय जे बेपारी, कारलगा – हट्टीचे मारुती पाटील , शारीरिक शिक्षक बी. डी. पाटील, एन. व्ही. कुराडे, निवृत्त शिक्षक नारायण पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जांबोटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी हनुमंत पाटील, नारायण जांबोटकर, निवृत मुख्याध्यापक नारायण पाटील आणि फारुख मुल्ला यांनी परशराम शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
२५ हून अधिक गीतांची निर्मिती
यावेळी परशराम शिंदे यांनी आपल्या स्वरचित गीतांचा सुरेल अल्बम सादर केला. त्यांनी विविध दैवतांवरील तसेच समाजप्रबोधनात्मक अशा 360 हून अधिक गीतांची रचना व निर्मिती केली आहे. उत्तम आवाज आणि सुरेल संगीताची जोड देत त्यांनी अनेक ऑडिओ तसेच व्हिडिओ तयार केले असून, लवकरच या गीतांचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कलात्मक कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
आपल्या मनोगतात परशराम शिंदे म्हणाले, “जीवनात अनेक सुख-दुःखांचा सामना करत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. मात्र, या सेवेसोबतच मनातील कलागुण समाजमनापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रकारच्या गीतांची रचना करून त्यांना सुरेल संगीत देत ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यासाठी अनेकांची साथ आणि समर्थन मिळत आहे.”