गणेश चतुर्थीपूर्वी मूलभूत सुविधा पुरवा; अन्यथा ग्रामपंचायतीला घेराव!
गुंजीतील युवा कार्यकर्त्यांचा इशारा; गटार स्वच्छता, पथदीप, पाणी व ग्रंथालयातील समस्या सोडविण्याची मागणी
खानापूर : गणेश चतुर्थीपूर्वी गुंजी गावातील गटारांची स्वच्छता, वाढलेली झाडे-झुडपे हटविणे, सांडपाण्याचा योग्य निचरा, बंद पथदीपांची दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा आणि ग्रंथालयाशी संबंधित समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा ग्रामपंचायतीला घेराव घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुंजी येथील युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गणेश चतुर्थीचा सण जवळ आला असून गावातील नागरिकांना विविध मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावातील अनेक पथदीप सध्या बंद असून ते गणेश चतुर्थीपूर्वी दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत. गावातील विविध भागांतील गटारे तुडुंब भरली असून अनेक ठिकाणी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून गटारे व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गावातील विहिरींची स्वच्छता करून त्यामध्ये आवश्यक औषध टाकण्यात यावे. गावातील विविध गल्ल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचीही नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यामुळे काही ठिकाणी सीसी रस्ता फोडण्यात आला आहे. मात्र काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फोडलेल्या भागात पुन्हा काँक्रिटीकरण करून रस्ता व्यवस्थित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
ग्रंथालयातील तीन संगणक बंद; विद्यार्थ्यांची गैरसोय
गावातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या चार संगणकांपैकी तीन संगणक नादुरुस्त असल्याने विद्यार्थी व वाचकांची मोठी गैरसोय होत आहे. हे संगणक तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर ग्रंथालय-वाचनालयात मराठी भाषेतील विविध पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
गणेश चतुर्थीपूर्वी या सर्व समस्यांवर ग्रामपंचायतीने ठोस कार्यवाही करावी. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामपंचायतीला घेराव घालून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देताना पंकज कुट्रे, महेश कापोलकर, सुभाष घाडी, अनिल देसाई, संजय कुट्रे, दिनेश आडकुरकर यांच्यासह अन्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.