IMG-20260805-WA0043

खानापूर :
मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी स्व. हलगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत आदरांजली वाहिली.
यावेळी प्राचार्य अरविंद पाटील यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच मन सुन्न झाले. क्षणभर कानांवर विश्वास बसत नव्हता. डोळ्यांत अश्रू दाटले आणि शब्दही मुके झाले. त्यांच्या अकाली जाण्याने मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तसेच संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “स्व. राजेश हलगेकर हे दूरदृष्टी असलेले, अभ्यासू आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व होते. संस्थेच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे असून विद्यार्थी आणि शिक्षकांना सातत्याने प्रोत्साहन देत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यांच्या रूपाने समाजाने एक दूरदृष्टीचा शिक्षणतज्ज्ञ, बहुआयामी विचारवंत आणि पारदर्शक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा संकल्प केला, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
या श्रद्धांजली सभेला प्रा. टी. आर. जाधव, प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. आर. व्ही. मरित्तमण्णावर, प्रा. नितीन देसाई, प्रा. सौ. व्ही. एम. गावडे, प्रा. सौ. एस. सी. कणबरकर, प्रा. सौ. एम. वाय. देसाई, प्रा. सौ. जे. एफ. शिवटणकर, क्रीडा शिक्षक प्रशांत पांखरे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Do Share
error: Content is protected !!
Call Us