file_000000006a107208af5d68a9533b341f


खानापूर :
खानापूर तालुक्यातील चापगावचे सुपुत्र, पर्यावरणप्रेमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व स्वर्गीय ह.भ.प. ज्योतिबा विठ्ठल कुऱ्हाडे यांच्या निधनाने केवळ कुऱ्हाडे परिवारच नव्हे, तर संपूर्ण परिसराने एक कर्तव्यदक्ष, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारा माणूस गमावला आहे.
गेली वीस वर्षे त्यांनी बेकवाड येथील व्यंकटेश्वरा नर्सरीमध्ये व्यवस्थापक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. औपचारिक शिक्षण सातवीपर्यंतच झाले असले, तरी भारतीय व विदेशी वृक्षांची त्यांना असलेली ओळख, त्यांची लागवड, संगोपन आणि संवर्धन यातील अनुभव विलक्षण होता. झाडांवर त्यांचे असलेले प्रेम आणि ज्ञान पाहून अनेक जण त्यांना चालते-बोलते वृक्षकोश म्हणत.


पुणे येथील उद्योजक श्री. नायडू यांच्या मालकीच्या नर्सरीत त्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करत नर्सरीला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कार्यामुळे बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योजक, शासकीय अधिकारी व मान्यवरांशी त्यांचे स्नेहबंध निर्माण झाले. नर्सरी ही केवळ नोकरी नसून आपले कुटुंबच आहे, या भावनेने त्यांनी आयुष्यभर सेवा केली.
चापगावचे माजी पैलवान स्वर्गीय विठ्ठल कुऱ्हाडे यांचे ते चतुर्थ सुपुत्र होते. बालपणापासूनच कुस्तीची आवड, ट्रॅक्टर चालक म्हणून काम, वाळू व्यवसाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसे जोडण्याची त्यांची हातोटी, यामुळे ते समाजात अत्यंत लोकप्रिय होते. चार भाऊ आणि चार बहिणींच्या प्रेमळ सहवासात वाढलेल्या ज्योतिबांनी आयुष्यभर नाती जपली, माणुसकी जपली आणि सर्वांना आपले मानले.
ऐन उमेदीच्या काळात आजारपणाने त्यांना ग्रासले. अनेक वर्षे त्यांनी या संकटाशी धैर्याने सामना केला. कन्येचा विवाह पार पाडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत, दिनांक २९ जून २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या सर्वांना कायमचे पोरके करून अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
त्यांच्या जाण्याने कुऱ्हाडे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे प्रेम, त्यांचा साधेपणा आणि पर्यावरणावरील निस्सीम प्रेम कायम स्मरणात राहील.
दयाघन परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच आज त्यांच्या अकराव्या दिनी विनम्र प्रार्थना.
॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
– तुझाच बंधू,
श्री. पिराजी कुऱ्हाडे
(पत्रकार)

Do Share
error: Content is protected !!
Call Us