माणिकवाडी जवळ आणखी एक अपघात!

कोंबड्या वाहतूक करणारा आयसर पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही

खानापूर : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच, त्याच अपघातस्थळापासून अवघ्या शंभर फूट अंतरावर बुधवारी पहाटे आणखी एक अपघात घडला. कोंबड्या वाहतूक करणारा आयसर ट्रक रात्री तीनच्या सुमारास पलटी झाला. सुदैवाने या अपघातात चालक व क्लिनर बचावले; मात्र वाहनातील जवळपास १,००० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

क्रेनच्या साहाय्याने वाहन हटवले

अपघाताची माहिती मिळताच पहाटे रस्त्यावर पलटी झालेला आयसर क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने मानवी जीवितहानी टळली.

जवान पती-पत्नीवर आज अंत्यसंस्कार

दरम्यान, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास खानापूरहून गावाकडे जाणाऱ्या तालुक्यातील जटगा येथील जवानाच्या दुचाकीला अवजड वाहनाची धडक बसून जवान व त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सदर जवान चारच दिवसांपूर्वी ऑन ड्युटी सुट्टीवर घरी आले होते. दोन वर्षांपूर्वी गावातीलच मोहिनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सुखी संसार सुरू असतानाच काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांवरही मोठे संकट ओढवले आहे.

दोन्ही मृतदेहांवर बुधवारी सकाळी शल्यचिकित्सा झाल्यानंतर दुपारी जटगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धोकादायक रस्ता! निष्कृष्ट दर्जाचे काम!

बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी होन कल ते लोंढा रामनगर पर्यंत

दोन दिवसांत अपघातांच्या घटनांनी चिंता वाढली

दोनच दिवसांपूर्वी, सोमवारी लक्केबैल येथील पुंडलिक नांदुरकर व अशोक नांदुरकर या बाप-लेकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जवान पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू आणि आता माणिकवाडी जवळ आयसर पलटी झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर लक्केबैल तसेच जटगा येथील दोन कुटुंबांवर ओढवलेले हे दुःख कधीही भरून न येणारे आहे.

वाहनधारकांनी काळजी घेण्याचे आवाहन

अल्पावधीत घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी वेगावर नियंत्रण ठेवावे, अवजड वाहनांनी सुरक्षित अंतर राखावे आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

खानापूर लाईव्ह | संपादक : पिराजी कुऱ्हाडे

Do Share
error: Content is protected !!
Call Us