IMG_20250225_201952


खानापूर लाईव्ह न्युज /पिराजी कुऱ्हाडे :

पुरातन काळापासून आदिशक्ती महालक्ष्मी देवी च्या इतिहासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आदिशक्ती, महामाया, महालक्ष्मी, जगदंबा, भुवनेश्वरी अशा अनेक अवतार आणि प्रसिद्ध अशा श्री महालक्ष्मी चा महिमा आघाद आहे. अलीकडच्या काळात या देवीचे नावे गावागावात होणारे श्री महालक्ष्मी यात्रोत्सव.

नुकताच खानापूर तालुक्याच्या दोन गावात महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात व आनंदात तसेच निर्विघ्न पार पडली. दरवर्षी अशी यात्रा अनेक गावात भरवली जाते. अमाप उत्साह, धार्मिकतेची कास, पै पाहुण्यांची रेलचेल, आर्थिकतेची अवाढव्य उलाढाल, अमाप खर्च, यामुळे झालेली उधळण, अन तितकाच आनंदाचा उत्सव यामधून आपण काय कमावलं..आणि काय गमावलं… हा चिंतनीय विषय आहे.

श्री महालक्ष्मी यात्रेच्या काळात तब्बल 9 ते 12 दिवस चालणारे हे सोहळे बरेच काही सांगून जातात. पूर्वीच्या काळात या यात्रा एकत्र येण्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा जिंकण्यासाठी सर्व समाजाला एकत्रित करून एकीची ताकद दाखवण्यासाठी या यात्रा, सोहळे भरवले जात असतात, पण अलीकडच्या काळात हे सोहळे परवडणारे आहेत का? हा विचार मनात येतो. धार्मिक रितीरिवाजाची, गाव गड्यांनी घेतलेल्या निर्णयाची उत्साहाने मिजास मिरवतो. पण भविष्यात याचे समोर येणारे परिणाम सहन करताना मात्र नाकीनऊ उडतेच. यात्रा म्हटलं कर्जबाजारी का होईना! सण साजरा करणे अनिवार्य ठरते.

महालक्ष्मी यात्रा न भूतो न भविष्यती!

अशाच पद्धतीने नंदगड मध्ये झालेली महालक्ष्मी यात्रा न भूतो न भविष्यती झाली खरी. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा भागातून अनेक भाविकांनी आनंद लुटला. पण या मधून यात्राकरू नंदगडवाशीयांनी पै पाहुणे तसेच उत्सवात आणलेले उधान एक अविस्मरणीय ठेवा ठरला. यात्रेच्या काळात उत्तम सजावट, घरांची रंगरंगोटी, नवीन साहित्यांची खरेदी, या गोष्टी कराव्यात लागल्या. त्यामुळे प्रत्येक घराला घरपण आले, घराघरात जणू लग्न सोहळेच ठरले. यात्रेपूर्वी दोन-तीन महिने अगोदर सुरू झालेली जय्यत तयारी अखेर 23 फेब्रुवारीला सायंकाळी संपली. श्री लक्ष्मी देवी सीमा इकडे गेली, घराघरात शांतता पसरली. जणू घरची लेक माहेरी गेली. असा आभास झाला. मंगळवार दि. 25 रोजी पुन्हा देवी मंदिरात विराजमान झाली. घराघरातील महिला सुहासिनीने देवीला ओट भरल्या, गावातील दैवदैवतांचे पुन्हा एकदा ऋण फेडले. गाव पुन्हा पूर्वपदावर आले. पण यात्रेत झालेला अवाढव्य खर्च तेथेच राहिला.

रंगले मांसाहारीचे बेत

येथील यात्रा उत्सवात पहिले चार दिवस घराघरात शाहाकारीची मेजवानी झाली. देवीला गोड नैवेद्य अर्पण झाले. पण घराघरातील शाकाहारी मेजवानीला गर्दी तोकडीच. रविवारी देवी गदगेवर विराजमान झाली. पण अडचण आली संकष्टीची, सोमवारी महादेवाच्या वाराची, त्यानंतर यात्रा संपेल तोपर्यंत मात्र प्रत्येकाच्या घरात ठरलेले मांसाहारीचे बेत हे शेवटपर्यंत कमी झाले नाहीत, त्यामुळे मांसाहारी भोजनावली आवाडव्य खर्च हा वाढताच ठरला. यात्रेच्या निमित्याने पै -पाहुणे मित्र परिवाराला भोजनावळीचा आनंद दिला. त्यात अनेक कुटुंबे तृप्त झाली. पण किती बकऱ्यांचा बळी गेला ..?

यात्रा भरतात आणि संपतातही. पण या यात्रा काळात उचलणारा आर्थिक डोलारा मात्र प्रत्येकाच्या डोकीवर टांगत्या तलवारीसारखा राहिला. सदन, पैसेवाल्या कुटुंबांची अडचण नसते हो, पण अनेक ठिकाणी जोडधंदे करून उपजीविका जगणाऱ्यांना मात्र याची कसरत करावीच लागते. सर्वसामान्य कुटुंबांना यातून सावरताना मात्र पुढची काही वर्षे कर्जाच्या खाईत जावे लागते यात शंका नाही. त्यामुळे अशा या महालक्ष्मी यात्रा भरवताना असणारा आनंद , मात्र उत्तरार्धात हा सावरताना मात्र चांगलीच गोची होते यात शंका नाही. नंदगड ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल बारा दिवस उत्साहात विविध कार्यक्रमाने आणि जल्लोषात पार पडली, यात्रा कमिटीने यात्रा भरवली, उत्सवाला देणग्याचा पाऊस झाला, मोठा निधीही जमा झाला, मात्र सर्वसामान्य कुटुंबांच्या खिशातील न परवडणारा खर्च म्हणतात ना… जनाच्या लाजेला.. आसरा कशाचा. अशा पद्धतीने अनेक गरीब सर्वसामान्य कुटुंबाने यात्रा भरवली. सर्वसामान्य कुटुंबांना सतत आठ ते दहा दिवस ठरलेला मांसाहारीचा बेत, पै पाहुण्यांच्या आहेर -माहेरचा रीतीरिवाज. जरी येथील पंच कमिटीने आहेरला फाटा देण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य कुटुंब आणि धार्मिक रितीरिवाज पुढे आणलाच. बऱ्याच कुटुंब आणि जुने रीतीरीवाज आचरणात आणले. पार पडले ही. प्रत्येक कुटुंबात आलेला खर्च पाहता अनेक कुटुंबांना सावरताना नाकीनऊ उडाली, पण कुणाला सांगणार! शेवटी हा प्रश्न निरुत्तरित राहतोच

नंदगड यात्रेत 400 कोटीचा चुराडा !

श्री महालक्ष्मी यात्रा काळात नंदगड गावात जवळपास 400 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे . प्रत्येक कुटुंबाने सरासरी तीन ते आठ लाखापर्यंत चा खर्च केला. नंदगड गाव हे 4000 कुटुंबाच्या लोकवस्तीचे गाव आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे अनेक कुटुंबाने या यात्रेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महालक्ष्मी यात्रा जरी हिंदू कुटुंबीयांनी उत्साहाने साजरा केली असली तरी तितक्याच उत्साहाने मुस्लिम तथा ख्रिश्चन बांधवांनीही या उत्सवात आपल्या पै – पाहुण्यांची आरास करून उत्साहात यात्रेत उधाण आणले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने सरासरी चार ते पाच लाखाचा खर्च केला तर नंदगड गावातच 200 कोटी पेक्षा खर्च झाला. शिवाय यात्रेला आलेल्या यात्रेकरू पै-पाहुणे त्याचा जवळपास शंभर कोटीचा आकडा पार होणे काही कमी नाही. त्यामुळे या एका यात्रेमुळे जवळपास 400 कोटीची उलाढाल झाली असावी असा प्राथमिक अंदाज समोर येतो.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us