खानापूर लाईव्ह न्यूज :
मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांच्या सर्वच पुस्तकात अनेक चुका असून त्या तात्काळ सुधाराव्यात तसेच तालुक्यातील शिक्षकांच्या तालुक्याबाहेरील बदल्या थांबवा, अशी मागणी गर्लगुंजी ग्रा.पं. माजी सदस्य प्रसाद पाटील व निट्टूर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष नागराज देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांना निवेदन सादर केले आहे.
आधीच खानापूर तालुक्यात मराठी शिक्षकांची कमतरता आहे. यावर्षी अभ्यासक्रम सुध्दा अपूर्ण आहे. त्यामुळे मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी बदली झालेल्या कोणत्याच शिक्षकांना तालुक्यातून सोडू नये. त्याचबरोबर मराठी माध्यम शालेय पुस्तकांमध्ये बऱ्याच चुका आहेत. त्यामुळे यंदा पुस्तकांची छपाई करताना काळजीपूर्वक करावे. जेणेकरून शिक्षक आणि मुलांना अभ्यास करताना अडचण निर्माण होणार नाही. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कामचोर शिक्षकांवर वचक ठेवा. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ग्राम पंचायत माजी सदस्य प्रसाद पाटील, निट्टूर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष नागराज देसाई, उपाध्यक्ष संतोष चोपडे, सदस्य परशराम पाटील, कल्लाप्पा गुरव, नागेश कांजळेकर, रवळनाथ कुसमळकर, रॉबर्ट डिसोझा आणि शंकर कम्मार उपस्थित होते. क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी या शिष्ठमंडळाशी सविस्तर चर्चा करून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तात्काळ पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.