जुलै महिन्यात पावसाने राज्यासह बेळगांव जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पावसाने आता काही काळ विश्रांती घेतल्याने जोरदार पडणारा पाऊस दमला आहे. परिणामी भातविकांना आता तांबेऱ्या रोगाची लागण सुरू झाली आहे रोप लागवड केलेल्या पिकात करपा रोग सुरू झाला असून पाणीही कमी झाल्याने खर्च करूनही शेतकऱ्यांच्या माती संकटे समोर आले आहेत त्यामुळे आगामी पंधरावाड्यात पूरक पाऊस नाही झाला तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागेल की काय अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
खरंतर गेल्या जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले शेती पिकांनाही उत्तम वातावरण निर्माण झाल्याने रोप लागवडीची कामे जोरात सुरू झाली आता रोप लागवडची कामे अंतिम टप्प्यात आहेत शिवाय रोप लागवडीत पाणी साठल्याने शेतकऱ्यांची टक आता आभाळाकडे राहिली आहे. पावसामुळे शेतात लावलेले भाताचे पीक काही प्रमाणात नष्ट झाले आहे. शेती ओसाड राहू नये म्हणून शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून राब (भाताचे रोप) घेऊन ते शेतात लावण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. शिवाय शेतीत पाणी संपल्यामुळे शेती पंपांना किंवा बोरवेल चा आधार घेऊन भात जगवण्याची वेळ आली आहे. भातशेती वाचवण्याचा शेतकऱ्यांचा हा अखेरचा प्रयत्न असला तरी, त्यामुळे काही प्रमाणात शेतातील पीक वाचण्यास मदत होणार आहे. पण ज्या ठिकाणी पाणीच नाही अशा ठिकाणी मात्र जमीन सुकत चालल्यामुळे पिकांनाही आता तांब्या रोगाची लक्षणे सुरू झाली आहेत. 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत आकाश निरभ्र राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून उशिरा दाखल झाला तरी त्याने तुफान बरसून जनजीवन विस्कळीत केले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे महापुराची भीती निर्माण झाली होती. पण आता मात्र पाऊस दमला आहे. त्याने उघडीप दिल्याने वातावरणात पुन्हा एकदा उष्णता जाणवत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
पावसाच्या विश्रांतीमुळे शेतीच्या कामांनीही वेग घेतला आहे. शहरालगतच्या गावांमध्ये पाल्याभाज्या पुन्हा बहरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात आता पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पालेभाज्या वाजवी किमतीमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बाजारातून होणाऱ्या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. स्थानिक बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांना मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाच्या पाण्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाया गेले आहे. त्यांनी आता आपल्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाताचे राब (रोपे) घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतात काही प्रमाणात भाताचे पीक डौलाने उभे राहण्याची आशा पल्लवीत झाली आहे. शेतकरी एकमेकांना अडीअडचणीच्या कालावधीत अशी मदत करत असल्यानेच सर्वसामान्यांच्या ताटात अन्नधान्य मिळत आहे.