खानापूर ( पिराजी कुऱ्हाडे):
आज (ता. ७) वाढदिवस आहे. अतिशय साधे, सज्जन आणि मृदुभाषी व्यक्तिमत्त्व असलेल्या खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे बारकाईने निरीक्षण केले तर त्यांची लोकांप्रती असलेली कळकळ लक्षात येते. राज्यातील सर्वाधिक मागासलेल्या खानापूर तालुक्याला विकासाच्य वाटेवर नेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या श्री. हलगेकर यांनी गेल्या दीड वर्षात आमदार म्हणून खूप काम केले आहे.
डिसेंबर महिन्यात बेळगावात झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी राज्य सरकारला विशेष विनंती केली होती. खानापूर तालुका हा राज्यातील सर्वात मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. मराठी भाषिक असले तरी कबड आणि मराठी भाषांशी संपर्क न गमावता दोन भाषांमधील मैत्रीचा सेतू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असलेले आमदार हलगेकर हे जन्मजात लढवय्या आहेत. शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी जवळून पाहिले आहे. त्यांचा आमदार होण्याचा मार्ग फुलांचा नव्हता. खूप मेहनत घेऊन ते आमदार म्हणून समोर आले आहेत.
खानापूर तालुका हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. विशेषतःखानापूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. तरीही जिल्ह्यात सर्वात कमी उत्पन्न असलेला शेतकरी याच तालुक्यात सापडतो. त्याचे कारण शेतीला लागणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा अभाव हे आहे. नद्या खानापुरात आणि धरणे, बांध, बंधारे तालुक्याबाहेर असे सध्याचे चित्र आहे. परिणामी निसर्गाच्या लहरीपणाचा धोका पत्करत शेती करण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय नाही. ही परिस्थिती पालटण्याचा ध्यास आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घेतला आहे. तालुक्यात तयार होणाऱ्या पाण्याचा तालुक्यातील भूमिपुत्रांसाठी कमाल वापर व्हावा. यासाठी त्यांनी दूरदृष्टीने अनेक पाणी योजनांची आखणी केली आहे. कसदार खानापूरला पाणीदार बनवण्यासाठी आमदार हलगेकर झपाटून कामाला लागले आहेत.
तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबल झाला तरच भौतिक सुविधांच्या विकासाला खरा अर्थ प्राप्त होणार आहे. रेल्वेचे दुपदरीकरण, नव्या महामार्गाची निर्मिती आणि रस्त्यांचा विकास या भौतिक सुविधांनी जगणे समस्या मुक्त झाले असले तरी ते समाधान युक्त होण्यासाठी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे हे आधुनिक विकासाच्या संकल्पनेतील सरळ साधे गणित आमदार हलगेकर यांना चांगलेच अवगत आहे. त्यामुळे आमदार हलगेकर यांनी बळीराजाच्या सर्वांगीण प्रगतीकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याचा कमाल वापर स्थानिक शेतकऱ्यांना करून देऊन नव्या पाणी योजनांची निर्मिती हे त्यांचे ध्येय आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांचा जन्मच शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. सिंचन योजनांच्या अभावामुळे तालुक्यातील शेतकऱ्याला आजही निसर्गावर अवलंबून राहावे लागते.
उसासाठी दुसऱ्यांच्या दारात थांबावे लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी उभा केलेला तालुक्याचा कारखाना भांडवलदारांच्या हातात गेला तर ते शेतकऱ्यांचे जगणे नकोसे करतील. तालुक्याची कामधेनू तालुक्यातीलच शेतकऱ्यांच्या हाती राहावी. या उद्देशाने श्री महालक्ष्मी शुगर अँड ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून लैला साखर कारखाना चालवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. संचालक मंडळ, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या जोरावर ते यशस्वीही झाले.
स्थानिक शेतकऱ्यांना आधार असणारे लैला साखर कारखाना आणि नजीकचा मलप्रभा साखर कारखाना हे दोन्ही कारखाने सुरळीतपणे सुरू राहावेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांकडे राहावा यासाठी आधी लैला साखर कारखाना समर्थपणे चालवून दाखविला. साखर उद्योगात काम करण्याचा कसलाही अनुभव पाठीशी नसताना केवळ शेतकऱ्यांची कामधेनू असणारा कारखाना बंद पडू नये. या हेतूने त्यांनी लैला कारखान्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शेतकऱ्यांना समाधानकारक दर देत असतानाच उसाची वेळेत उचल करणे. गरजू शेतकऱ्यांना आगाऊ मदत करणे. प्रयोगशील शेती बाबत मार्गदर्शन करणे. यासारखे उपक्रम ते राबवित आहेत. यंदा कारखान्याची गाळप क्षमताही वाढवण्यात आली आहे. सध्या चार हजार टन प्रतिदिन गाळप सुरू असून लवकरच ते पाच हजार टन प्रतिदिन क्षमतेपर्यंत वाढवण्यात येणार आहे. पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. वीस कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक बॉयलर यंत्रणा उभी करण्यात आली आहे. त्यामुळे बॉयलरमध्ये वारंवार होणारे बिघाड थांबून कारखाना सुसूत्रपणे सुरू राहणार आहे. कर्मचाऱ्यांचेही त्रास कमी झाले आहेत. आगामी काळात टरबाइनची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यानंतर लैला कारखाना 5000 टन प्रति दिन गाळप करण्यास सक्षम होणार आहे. त्या पाठोपाठ आता एमके हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखाना देखील चालवण्यासाठी अर्थसहाय्य केले आहे. या कारखान्याने देखील एक लाख टन गाळप पूर्ण केले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी ग्रुप या कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने परिसरातील शेतकरी डोळे बंद करून मलप्रभा साखर कारखान्याला ऊस पाठवीत आहेत. शेतकऱ्यांची मुले असल्याने पिकाची काळजी घेताना बळीराजाची होणारी धडपड त्यांना माहित आहे. पिकासाठी शिवारात प्रसंगी जीव मुठीत घेऊन कष्ट करणारा शेतकरी त्यांनी जवळून पाहिला आहे. शेतकऱ्याचे त्रास आणि कष्ट प्रत्यक्ष अनुभवल्याने आमदार हलगेकर सरांनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा चंग बांधला आहे.
लैला कारखाना बंद असताना तालुक्यात पाच लाख टन देखील उसाचे उत्पादन घेतले जात नव्हते. पण लैला कारखान्याची स्थिरावलेली घडी पाहिल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनाकडे वळला असून सध्या बारा लाख टन ऊस उत्पादन घेतले जात आहे. शेतकऱ्याला आपल्या घामाच्या दामासाठी दुसऱ्यांच्या दारात जाऊन उभे राहण्याची वेळ येऊ नये. बिल कधीही द्या पण आधी ऊस नेऊन माझे शिवार मोकळे करा अशी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. ही परिस्थिती बदलण्यात त्यांना यश आले आहे. आमदार हलगेकर यांनी असंख्य आव्हानांना तोंड देत महालक्ष्मी ग्रुपची उभारणी केली. दीड रुपयाच्या फंडातून उदयाला आलेला महालक्ष्मी ग्रुप एक साखर कारखाना सुस्थितीत चालवून दाखवू शकतो. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही पण हलगेकर सरांच्या सचोटी आणि डोळस नियोजनामुळे ते शक्य झाले आहे.
विधायकता हा आमदार विठ्ठल हलगेकर यांचा श्वास आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी कृषी मेळाव्याचे आयोजन करून आपला वाढदिवस देखील शेतकऱ्यांनाच समर्पित केला आहे. कृषी क्षेत्रात नवे काय घडत आहे. ते खानापुरात आणता येईल का? स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देता येईल का ? याचाच ते सदोदित विचार करत असतात. शेती आणि शेती तंत्रज्ञानाबद्दल त्यांना असणारी आवड त्यांची माती विषयी निष्ठा आणि श्रद्धा दर्शवणारी आहे.
हलगेकर यांच्या कार्याचा आढावा
■ खानापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांकरिता १४ कोटींचा निधी मंजूर. असोगा भुयारी मार्गासाठी १६ कोटींचे अनुदान.
■ ग्रामीण विकास व पंचायतराज खाते, शिक्षण खाते, पशुसंगोपन खात्यासाठी १ कोटी ३२ लाखांचा निधी.
■ पाणी निचरा, वाल्मिकी भवन, रस्ता व गटार तसेच तालुक्यातील पश्चिम भागाकरिता ४ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर.
■ महात्मा गांधी ग्रे वॉटर पारिश्वाड, इटगी व नंदगड येथे ३ कोटी ४५ लाख निधी.
■ नंदगड संगोळ्ळी रायण्णा कमान ते फाशी स्थळापर्यंतच्या काँक्रिट रस्त्याकरिता २ कोटी ४० लाखांचा निधी.
■ १०० खाटांच्या जनरल इस्पितळासाठी १५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर, त्याचे भूमिपूजनही झाले.
■ अमृत २.० अंतर्गत शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी २० कोटी ५२ लाखांची तरतूद.
■ देगाव येथील गावडे कुटुंबीयाला तातडीची आर्थिक मदत.
■ करंबळ क्रॉस ते मराठा मंडळपर्यंतच्या काँक्रिट रस्त्यासाठी निधी मंजूर.
■ तालुक्यातील तलाठींना २० संगणक वितरण, १० लाखांच्या निधीची तरतूद
■ याबरोबरच वारकरी मंडळीसाठी पंढरपूर विशेष रेल्वे सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला, कीर्तन, भजन कार्यक्रमांसह मंदिरासाठी तसेच विविध पुतळा उभारणी, मठ, मंदिरे, समुदाय भवन, शाळा यासाठी आर्थिक मदत केली आहे. विविध शासकीय कामांचे उद्घाटन, भूमिपूजनही केले आहे.