Home » खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती लढवणार जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका!

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती लढवणार जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका!

Screenshot_2026-10-15-18-40-35-11_96b26121e545231a3c569311a54cda96

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती लढवणार जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका!

सर्व जागा लढवण्याचा एकमुखी ठराव; १ नोव्हेंबरचा काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका सर्व जागांवर लढवणार असल्याचा एकमुखी ठराव समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून, इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांत जनजागृती करून निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन करण्यात आले.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका, सीमाप्रश्न, १ नोव्हेंबरचा काळा दिन, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था तसेच विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१ नोव्हेंबरचा काळा दिन गांभीर्याने पाळणार

१ नोव्हेंबर २०२६ रोजी राजा शिवस्मारक भवनातील माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. यावेळी हाताला काळ्या फिती बांधून केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

बेळगाव महानगरपालिकेतील ठरावाचा निषेध

बेळगाव महानगरपालिकेत बेळगाव कर्नाटकचेच असल्याचा ठराव मंजूर करणाऱ्या तसेच त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नगरसेवकांचा बैठकीत निषेध करण्यात आला. या ठरावाला विरोध करून सभात्याग करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर आणि नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या भूमिकेचे अभिनंदन करण्यात आले.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. लोकशाही प्रक्रियेतून नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधाचा ठरावही संमत करण्यात आला.

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

खानापूरचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी १ नोव्हेंबर राज्योत्सवाच्या तयारीसंदर्भात समाजमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. राज्योत्सव हा खानापूर तालुक्याची संस्कृती आणि मानबिंदू वाढवणारा उत्सव असल्याचे त्यांनी म्हटल्याचा उल्लेख करत, या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची भूमिका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपयांचा दर द्या

केंद्र आणि राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दर देण्याबाबत निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

खानापूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रस्त्यांचे पुनर्निर्माण वेळेत न झाल्यास आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

पुणे विभाग समिती व युवा समितीच्या कार्याचे कौतुक

पुणे विभाग समितीने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची तसेच युवा समिती सीमाभागच्या वतीने बिदर, भालकी, औराद व संतपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेची बैठकीत दखल घेऊन कौतुक करण्यात आले.

समितीच्या एकजुटीचे आवाहन

समितीमधून राष्ट्रीय पक्षांत गेलेल्या किंवा तटस्थ राहिलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मूळ प्रवाहात सामील व्हावे. संघटना अधिक मजबूत करून सीमाप्रश्न सुटेपर्यंत एकजूट कायम ठेवावी आणि प्रत्येक लढ्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, मध्यवर्ती समितीचे सदस्य राजाराम देसाई, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, वसंत नवलकर, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संजीव पाटील, रवींद्र शिंदे, बाबुराव पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, मोहन गुरव, आप्पाराव मुतकेकर, ज्योतिबा खाडे, देवाप्पा भोसले, किरण पाटील, कृष्णा मनोळकर, मरू पाटील, गजानन बेळगावकर, नाना घाडी, विठ्ठल गुरव, शंकर गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us