अनगडी येथे उद्यापासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
अनगडी येथे उद्यापासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
कलमेश्वर मंदिराच्या चौथारा बांधणीसाठी जागादान करणाऱ्या मिराशी दाम्पत्याचा होणार सन्मान; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन
अनगडी / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील अनगडी येथे श्री कलमेश्वर मंदिराच्या अधिष्ठानासाठी सोमवार, दि. १९ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार व मंगळवार, दि. १९ व २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जागादान करणाऱ्या दानशूरांचा होणार गौरव
श्री कलमेश्वर मंदिराच्या चौथारा बांधणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचे निःशुल्क दान करून सेवाभावाचा आदर्श निर्माण करणारे श्री. नर्मदा नारायण मिराशी व सौ. नर्मदा नारायण मिराशी यांचा सपत्नीक, तसेच श्रीमती तुळसाबाई मारुती मिराशी यांचा साडी-चोळी देऊन उत्सव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. कीर्तनकार ह.भ.प. सौ. नेहाताई साळेकर यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.
मंदिराच्या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी जागादान करून मिराशी कुटुंबीयांनी दातृत्व आणि सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा जपली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल उत्सव समितीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता दुर्गामाता दौड होणार आहे. सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री. सदोबा मिराशी यांच्या निवासस्थानापासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता पालखी श्री कलमेश्वर मंदिरात दाखल झाल्यानंतर कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
दुपारी ३ ते ४ या वेळेत कीर्तन, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रवचन आणि त्यानंतर हरिनाम जप व रात्री १० वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता काकड आरती, त्यानंतर ग्रामदेवता श्री कलमेश्वराला बेलपत्रांच्या अर्पणासह विविध धार्मिक विधी होणार आहेत. सकाळी १० वाजता काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्यास माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील, माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हरिनाम सप्ताहाच्या यशस्वितेसाठी अनगडी हरिनाम सप्ताह समिती व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. परिसरातील भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.