file_00000000f4ec820892f7280cd2f2819c

IISER पुणे, लोकमान्य एज्युकेशन सोसायटी व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा संयुक्त उपक्रम

खानापूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि लोकमान्य एज्युकेशन सोसायटी, बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘iRISE’ या संशोधन, नवोपक्रम व STEM शिक्षणविषयक उपक्रमांतर्गत दोन दिवसीय शिक्षक विकास कार्यशाळेचे आयोजन खानापूर येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती डॉ. दत्तात्रय एन. मिसाळे यांनी दिली.

ही कार्यशाळा २८ व २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत LES’s व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, लोकमान्य भवन, विद्यानगर, खानापूर येथे होणार आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी ISROचे निवृत्त अंतराळ शास्त्रज्ञ व अभियंता तसेच NDT & LPSCचे माजी ग्रुप डायरेक्टर श्री. विष्णुपंत एन. मिसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पीटर डी’सूझा, खानापूरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी एम. जी. हट्टी, iRISE IISER पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे, संसाधन व्यक्ती प्रज्ञा पुजारी आणि भारत टोम्बरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. किरण डी. ठाकूर, संस्थापक अध्यक्ष LMCS व LES आणि तरुण भारत प्रा. लि.चे सल्लागार संपादक, राहणार आहेत.

यावेळी लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सचिव सत्यव्रत व्ही. नाईक, शैक्षणिक समन्वयक डॉ. दत्तात्रय एन. मिसाळे, व्ही. वाय. चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिरीष एम. केरूर, संचालक प्रकाश चव्हाण आणि संचालक विवेक गिरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संशोधन, नवोपक्रम आणि STEM शिक्षणावर भर

‘Inspiring India in Research, Innovation and STEM Education Program’ (iRISE) या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांमध्ये संशोधनाची दृष्टी विकसित करणे, नवोपक्रमाची क्षमता वाढविणे आणि STEM शिक्षणाच्या आधुनिक पद्धतींचा प्रसार करणे हा आहे.

दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, संशोधन आणि नवोपक्रम यासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. आधुनिक शिक्षणपद्धतींचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

खानापूर परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित या कार्यशाळेमुळे शिक्षण क्षेत्रात संशोधन व नवोपक्रमाला चालना मिळून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us