
खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :

खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे आज मंगळवार दि. २९ एप्रिल पासून २ मे पर्यत होणार आहे. मंगळवारी दि २९ रोजी यात्रेचा पहिला दिवस असुन मंगळवारी सकाळी गावातील देवदेवतांची विधीवत पुजा होऊन सायंकाळी गावातुन पालखी वाजत गाजत माऊली मंदिराकडे प्रस्थान होईल. त्यानंतर ग्रामदेवता माऊली देवीची विधीवत पुजाआर्चा होऊन गार्हाणे घालण्यात येणार आहेत. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे मानकर्याच्या घरातून सुवासिनी वाद्याच्या निनादात वाजत गाजत आरती घेऊन माऊली मंदिराकडे प्रस्थान होतील. यावेळी माऊली देवीला अभिषेक, विधीवत पुजा होऊन सुवासिनी कडुन आरती होऊन इंगळ्याचा कार्यक्रम होणार . त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभहोणार आहे. रात्री गावात मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी रात्री भाविकासाठी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी यात्रेचा शेवटचा दिवस यादिवशी असून पालखी उत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
गर्लगुंजीत इंगळ्या नाहण्याची परंपरा!
गर्लगुंजीत असलेल्या श्री माऊली देवी तसेच स्थळ देवस्थानचा इतिहास मोठा आहे. येथे एकेकाळी राणोजी पाटील व तुळोजी पाटील हे बलदंड साम्राज्यशाही 1838 च्या काळात होऊन गेले. राणोजी पाटलांचा विवाह जवळच्याच एका गावातील कन्येशी झाला होता. वऱ्हाडी परतत असताना गर्लगुंजीच्या वेशीत राणोजी पाटलाच्या विरोधकांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला घनघोर युद्ध झाले.त्या युद्धामध्ये राणोजी पाटील व तुळोजी पाटील हे दोघे बंधू मारले गेले. त्यामुळे या विवाह सोहळ्यात मोठा अडथळा निर्माण झाला. नववधू असलेल्या त्या कन्येने राणोजी पाटील यांच्या चितेवर स्वतः उडी टाकून सती गेली. त्या सती गेलेल्या नववधूच्या नावे आजही गर्लगुंजी या ठिकाणी इतिहासाची साक्ष म्हणून इंगळ्या नहाण्याचा कार्यक्रम दरवर्षी होणाऱ्या माऊली देवीच्या यात्रा उत्सवात केला जातो. श्री माऊली देवी ही राणोजी व तुळोजी पाटील यांची कुलदेवता होती. त्यामुळे त्या कुलदेवतेच्या परिसरातच शेकडो बळी गेलेल्या त्या परिवारातील वीर युद्धांची आजही त्या ठिकाणी स्मरण देणारी थडगी आहेत. थळ देवस्थानात सैनिकांच्या शेकडो दगडी मूर्त्या जेंव्हा शत्रुनी राणोजीच्या लग्नाच्यावेळी वऱहाडीवर हल्ला करुन त्यांचा वध केला. त्यावेळी त्यांचे अनेक बलदंड सैनिक मारले गेले. त्या सैनिकांची आठवण म्हणून त्यांच्या शेकडो दगडी प्रतिकृती आजही येथील माउली मंदिरासमोर असलेल्या थळ देवस्थानच्या ठिकाणी जेथे राणोजी पाटलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मूर्तीच्या तिन्ही बाजूनी मूर्तीच्या दगडी तटबंदीत बसवण्यात आल्या आहेत. सदर प्रसंग मंगळवार व बुधवार या दिवशीच घडला असल्याने या देवीची यात्रा साजरी करण्याची प्रथा आहे. बुधवारी सकाळी देवीच्या सतीच्या नावे दोन सुहासिनी गावातून देवालयाकडे आरती घेऊन जातात. त्या दोन सुहासिनी मंगळवार पूर्ण दिवस उपास करतात. सुहासिनींच्या हस्ते देवीला व स्थळाला आरती ओवाळणी झाल्यानंतर इंगळ्यांची पूजा केली जाते. त्यानंतर प्रथमत: उपवास धरुन आरती केलेल्या सुहासिनीनी इंगळय़ा न्हाण्याची प्रथा आहे.
विवाहाच्या बोहल्यावर चढलेल्या त्या नववधुनी स्वतःला सती जाण्याचा निर्णय घेतला. मात्र इकडे माहेरवाशीय पाटील घराण्यातल्या लोकांनी नाते तेथेच तोडले. त्या नववधूची स्थापना सध्या असलेल्या तालुक्यातील ” त्या” नामांकित गावातील मंदिराच्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे आजही त्या जवळच्या गावातील मुलीना वधू म्हणून गर्लगुंजी येथे नाते जुळत नाहीत . कालांतराने ही सती गेलेल्या त्या कन्येचा अतृप्त आत्मा येथेच भटकू लागला. या देवीच्या इतिहासामागे गर्लगुंजी येथील पाटील घराण्याचा इतिहास जोडला जातो, असे म्हटले जाते.