कांही माणसं ध्येयवेडी असतात. त्यांनी स्वतः:चे लक्ष्य निश्चित केलेले असते. ते आनंदी करण्यासाठी ते कोणतेही अग्नीदिव्य पार पाडण्यात कुचराई करत नाहीत. आपली माणसं जपतानाच नात्या-गोत्यांचा लवाजमा आपल्या सभोवताली ठेवुन असतात. अशी माणसं जिवनात यशस्वी तर मार्गच; शिवाय अशी माणसं पाठीमागे अविस्मरणीय अशा आठवणी देखील जातात. असेच एक पितृतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे मळव (ता. खानापूर) येथील नागाप्पा दत्तू कदम (नाना). बुधवार.२७ नोव्हेंबर रोजी त्यांचे निराकरण दि. आज आकराव्या दिवस जागविलेल्या या आठवी..
मळव एक छोटसं गाव… एखाद्या चित्रपटासारखे भासावे असे मलप्रभेच्या तिरावर वसलेलं हे गाव म्हणजे एक आदर्शच. तालुक्याची जीवनदायिणी मलप्रभेने गावाला वळसा घालून समृध्द केलेल्या या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे साधन. ज्या काळात पैशांना आताच्या एवढे महत्व नव्हते. माणुसकी आणि विश्वास हे भांडवल होते. त्याकाळात कै. नागाप्पा कदम यांनी बालपणातच बैलांचा कासरा हातात घेत शेतीत जम बसविला. दरवर्षी कोपणारी मलप्रभा नदी आणि त्यामुळे होणारे शेतीचे नुकसान झेलत. संसाराचा गाडा हाकतांना त्यांनी कधीच कामात हयगय केली नाही. कामाशिवाय, कष्टाशिवाय दाम मिळत नाही, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ते सदसान्कदा आपल्या कामात व्यस्त असलेले दिसायचे.
कान्सुली, अल्लोळी आणि मळव या तिन्ही गावांचे धार्मिक आणि सामाजिक व्यवहार एकत्रच होतात. पुर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही अखंड आहे. या तिन्ही गावातील पंचात नागाप्पा (नाना) यांना मानाचे स्थान राहीले. गावातील भांडण-तंट्यांचा न्यायनिवाडा असो की तिन्ही गावांशी संबंधीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नियोजन असो. नागाप्पा कदम यांचा सहभाग नेहमीच अग्रस्थानी असायचा. गावातील कुणी मयत झाले तरी अंत्यसंस्कारासाठी लागणारा बाजारहाट नानांशिवाय पूर्ण होत नसे. रितीरिवाज आणि संस्कृती संवर्धनाच्या कामात त्यांची आघाडी नेहमीच अचंबीत करणारी असायची.
गावातील सण-उत्सव, सामजिक कार्यक्रम-समारंभातदेखील त्यांचा सहभाग असायचा. आबालवृध्दांना सामावून घेत गावाच्या विकासाला हातभार लावण्यात ते कधीच कंजूषी करीत नव्हते.
अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यामुळेच की काय त्यांचा खानापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राहीले. शेवटपर्यंत ते स्वत: मात्र म.ए.समितीशी एकनिष्ठ राहिले. रस्ता असो, शाळेचा विकास असो किंवा गावातील कोणत्याही विकास कामांना त्यांच्या होकाराची गरज भासायची. किंबहुना त्यासाठी ते आग्रही राहत. संबंधीतांकडून काम करून घेत. स्वत: कधीच राजकारणात पडले नाहीत, पण राजकारण करणाऱ्यांना त्यांचा दांडगा वचक होता. तालुक्यातील एखादा नेता गावात आला तर नानांना भेटल्याशिवाय परतत नसे. पण म्हणून त्यांनी गर्व केला नाही. उलट ते शेवटपर्यंत साधा माणूस म्हणून जगले.
कुटुंबवत्सल नाना
नागाप्पा कदम यांच्याशी माझा १९९८ पासूनचा स्नेह होता. त्यंना रागवतांना मी कधी पाहीले नाही. तसे ते कुटुंबवत्सल होते. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या नानांनी पारंपारिक शेतीला महत्व देत काबाडकष्ट केले. सकाल त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत गेले. वयाची साठी ओलांडल्यानंतरही नाना शेतीशी इमान राखून होते. पारंपारिक शेती करूनदेखील चांगले उत्पन्न घेता येते, यावर त्यांचा विश्वास होता, त्यामुळेच ते स्वत: शेतीच्या कामात लक्ष घालीत. मुलांनादेखील ते त्याच पध्दतीने शेती करण्यासाठी आग्रही असत. शेतीच्या अत्याधुनीक पध्दतीची चलती असतांना हा माणूस पारंपारिक शेती करून चांगले उत्पन्न घेतो, याबाबत सर्वांना आश्चर्य वाटायचे. त्यासाठी त्यांचे कष्ट कारणीभूत असायचे.
अनेक संकटांना दोन हात करीत त्यांनी मुलांना शिकविले. मुलगीवर विशेष जीव असणाऱ्या नानांचे दोघा चिरंजीवांवरही तितकेच प्रेम. मोठा मुलगा विष्णू यास शिकवून देशसेवेसाठी भारतीय सैन्यात पाठविले, तर धाकटा महेश यास समाजसेवेचे धडे दिले. तो स्वत:च्या व्यवसायात स्थिरस्थावर झाला आहे.
नाना म्हणजे कुटुंबवत्सल माणूस. विवाहीत मुलगी, जावई, दोन मुलगे, सुना आणि डझनभर नातवंडात नानांच्या आयुष्याचा उत्तरकाळ मजेत जात असतांनाच त्यांना शारिरीक व्याधीनी गाठले. तसे नाना धिरोधात्त, पण या व्याधींना दोन हात करतांना दमछाक उडाली. त्यात ते मलूल झाले, थिजले. आणि अखेर त्यांनी बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जाणे मनाला चटका लावणारेच होते. ते आयुष्यभर घर संसाराबरोबच समाजाच्या भल्यासाठी झटत राहिले. झिजले. त्यातून त्यांनी त्यांच्या पाऊलखुणा समाजपटलावर सोडल्या आहेत. त्या पाऊलखुणा त्यांची पदोपदी आठवण करून देत राहतील. त्यांच्या आत्म्यास चीरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थणा..!
- चेतन लक्केबैलकर, नागुर्डा-खानापूर