खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर शहरातील सुप्रसिद्ध व पुरातन श्री संस्थान गौडपादाचार्य कवळे मठ शाखा खानापूर या ठिकाणी नव्याने पुन्: निर्मित मठाचा प्रतिष्ठा महोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन येत्या रविवार दि. 22 डिसेंबर ते शुक्रवार दिन. 27 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पूज्य श्री श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी, ब्रह्मभौर्य श्रीमंत सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सार्वजनिकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गौड पदाचारी संस्थान कवळे मठाचे विश्वस्त श्री शरद मोहनराव केशकामत यांनी केले.
khanapur: पुनर्निर्मित करण्यात आलेला श्री कवळेमठ
खानापूर येथील श्री कवळे मठात सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाचे स्वरूप व मठाचे महत्व याबद्दल विश्वस्त मंडळाने माहिती दिली. यावेळी प्रकाश देशपांडे, प्रशांत खासणीस, सुधीर देशपांडे, पंकज दलाल, प्रमोद दलाल, उमेश देशपांडे, सुधीर देशपांडे, विकास वर्दे, दिलीप शहापूरकर, मंगेश देशपांडे, प्रसाद खासनी हर्षद वागळे, मिरज पालेकर आदी उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती देताना शरद केशकामत म्हणाले, पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रविवार दि. 22 रोजी सायंकाळी पाच वाजता राक्षोघ्न विधी कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात होणार आहे. सोमवार दि. 23 रोजी सकाळी 8 वाजता विविध धार्मिक विधी वास्तुशांती होम हवन होणार आहे मंगळवार दि. 12 रोजी शांती सूक्त सिद्धी विधीहवन असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालणार आहेत. बुधवार दि. 25 रोजी सकाळी धार्मिक विधी दैवतांचे पूजन श्री उमा महेश्वर व यतीवर्य प्रतिष्ठा सकाळी 8.15 वा. च्या मुहूर्तावर होणार आहे त्यानंतर शिखर कलश प्रतिष्ठा मुहूर्त सकाळी 8.30 वा. ब्र .भु. यतीवर्य समाधी प्रतिष्ठा 8.55 च्या मुहूर्तावर होणार आहे. त्यानंतर दिवसभर महाप्रसाद व धार्मिक विधी होतील. दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी मंगलचरण पुण्याहवाचन आचार्य वरण लघुरुद्र मनुसूक्त जप होऊन अधिक कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता अष्टवधन सेवा कार्यक्रम होईल व दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता मंगलचरण दिवसभरात विविध कार्यक्रम होऊन सायंकाळी या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 25 ते दि. 27 रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सार्वजनिकानी या सोहळ्यास उपस्थित राहून उपकृत व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
बोलताना ज्येष्ठ प्रकाश देशपांडे म्हणाले, या मठाला पुरातन काळाचा इतिहास असून या ठिकाणी गेली अनेक वर्ष चातुर्मास आयोजन केला जात होता ती परंपरा पुढील वर्षापासून या मठामध्ये सुरू केली जाणार आहे. शिवाय या ठिकाणी समाज बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहे.. श्री कवळे मठाचा इतिहास!
या मठाच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती देताना शरद केशकामत म्हणाले, साधारण आठव्या शतकापासून श्रीमद गौडपादाचार्य संस्थानला गौरवशाली धार्मिक, अध्यात्मिक, वेदाध्ययनाचा वारसा लाभला आहे. सध्या असलेला खानापुरातील मठ हा या संस्थानची महत्त्वाची शाखा आहे. पूर्वी संपूर्ण संस्थानचा कारभार याच मठातून चालवला जात होता. बहुतेक चातुर्मास उत्सव देखील पूर्वीच्या काळी याच मठात होत असत. पण १९६८ नंतर संस्थानच्या इतर शाखांमध्ये चातुर्मास उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र व काही वेळा केरळमध्ये देखील स्वामीजींचा चातुर्मास उत्सव झाला आहे.
सध्याच्या खानापूरस्थित मठाचा श्रीशके १६७९ म्हणजेच इ.स. १७५७ मध्ये पहिल्यांदा जिर्णोद्धार करण्यात आला. खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठावर श्री गौडपादाचार्य स्वामींचा पुरातन मठ वसला आहे. या भव्य मठाच्या मध्यभागी श्री उमा महेश्वराचे (पंचमुखी शंकर) मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूच्या पडसाळीमध्ये श्री रामानंद सरस्वतींची समाधी आहे. येथे प्रतिवर्षी श्रावण वद्य चतुर्थीला स्वामींची पुण्यतिथी साजरी केली जाते. मंदिराच्या उजव्या बाजूच्या मागच्या खोलीत दोन समाध्या आहेत. त्यापैकी एक श्री रामानंद सरस्वतींची असून दुसरी समाधी श्री आत्मानंद सरस्वतींची आहे. श्री रामानंद सरस्वती यांची पुण्यतिथी कार्तिक शुद्ध त्रयोदशी व आत्मानंद सरस्वतींची पुण्यतिथी माघ वद्य चतुर्दशी रोजी साजरी केली जाते. हा मठ श्री रामानंद सरस्वती स्वामींनी शके १६७९ साली बांधला असल्याचे कोरीव लेख या मठात उपलब्ध आहेत. या मठाच्या खर्चा करिता श्रीमंत पेशवे सरकारांकडून मन्सापुर हा गाव इनाम मिळाला आहे. त्याशिवाय श्रीमान लखमसावंत भोसले प्रांत कुडाळ यांच्याकडून लाकूडवाडी तालुका चंदगड हा गाव इनाम देण्यात आला होता. तसेच हेरे संस्थानातूनही गाव इनाम देण्यात आला होता.
श्री गौडपादाचार्य हे शुकाचे शिष्य आणि आद्य शंकराचार्याचे गुरु गोविंद पादाचार्य यांचे गुरु होय. मठाच्या गोमंतकासह कुडाळ, कवळे, सोनवडे, वाळकेश्वर मुंबई, नाशिक, खानापूर, साखळी, सदाशिवगड, हाळगा, गोकर्ण, शिरसी, मंगलोर, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी शाखा आहेत. संस्कृत अध्ययनासाठी प्रसिद्ध पाठशाला खानापूर मठात होती. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बटुक संस्कृत व वेदाध्ययनासाठी खानापूर मठात वास्तव्य करत. खानापूर येथील पाठशाळेत वेदाध्ययन केलेले अनेक शिष्यगणांना महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये धर्मसेवेचा मान मिळाला आहे. खानापूरच्या मठाने धार्मिक कार्यांबरोबरच समाज बंधूंच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी वेळोवेळी मदतीचा हातभार लावला आहे. मठाच्या पुनश्च जीर्णोध्दार करण्याची संकल्पना आत्ताचे स्वामीजी परमपूज्य शिवानंद सरस्वती स्वामीजी यांच्या आशीर्वादाने गेल्या तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आली.