खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
व्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत हळदीची लागवड करून मिळालेले उत्पादन आम्हीच खरेदी करून पैसे देतो, असे सांगून खानापूर येथील एका शेतकरी महिलेला १ कोटी रुपयांची टोपी घालून फरारी झालेल्या ठाणे येथील तिघा ठकसेनांना जिल्हा सीईएन पोलिसांनी गुरुवारी (दि. २६ अटक केली आहे.
प्रशांत गोविंदराव झाडे (वय ४७), संदेश गणपत खामकर (वय ४८), संदीप चिंतामण सावंत (वय ५५, तिघेही रा. ठाणे-मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी देशभरात चार हजारांहून अधिकजणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मणिबेन विठ्ठलदास पटेल (रा. खानापूर) असे फसवणूक झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. हे कुटुंब मूळचे गुजरातेतील आहे. त्यांना वरील तिघांनी २०२२ मध्ये गंडा घातला होता. एमएसएएस अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी कंपनीमध्ये एक कोटी रुपये गुंतवल्यास त्या मोबदल्यात तुम्हाला व्हर्टीकल फार्मिंग अंतर्गत हळदीची लागवड करून देऊ. तसेच मिळालेले उत्पन्न आम्हीच खरेदी करून त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे दिले जातील, असे सांगून त्या शेतकऱ्याकडून खानापूर येथील आयसीआयसीआय बँक खात्यात दोन टप्प्यात एक कोटी रुपये वर्ग करून घेतले. मात्र, त्यानंतर फार्मिंग तर नाहीच पैशांचा परतावा देखील केला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याने संबंधितांकडे पैशासाठी तगादा लावला. पण, त्यांनी उडवाउडवी केली. त्यांच्याशी संपर्कदेखील होऊ शकला नाही. त्यामुळे याप्रकरणी खानापूर पोलिसांत संबंधितां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण जिल्हा पोलिस प्रमुखांनी तपासासाठी जिल्हा सीएन पोलिसांकडे वर्ग केले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वरील तिघा संशयितांना पुण्यातून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करत आहेत.
व्हर्टिकल फार्मिंग मध्ये अनेक वेळा फसवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रात अनेक जणांना टोपी घालण्याचे प्रकार घडले असून नागपुरातूनही जवळपास साडेतीन कोटीचे प्रकरण जून महिन्यात उघडकीस आले होते.
व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय?
व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे ग्रीनहाऊस किंवा फील्डसारख्या एकाच पृष्ठभागाऐवजी, उभ्या रचलेल्या थरांमध्ये पिकांची लागवड करण्याची प्रणाली. साधारणपणे, शेती करणारे हे उभ्या संरचनेत समाविष्ट करतात, जसे की शिपिंग बॅरल्स, गगनचुंबी इमारती, वापरलेली गोदामे आणि बेबंद खाण शाफ्ट. अशा ठिकाणी केली जाते.