IMG_20240404_153321

  • कारवार: (संपादकीय)
  • उत्तर कन्नड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले खासदार अनंतकुमार हेगडे यांना यावेळी भाजपकडून तिकीट देण्यात आलेले नाही. त्यांच्या ठिकाणी माजी सभापती विश्वेश्वर हेगडे हे भाजपचे उमेदवार आहेत. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे उत्तर कन्नड लोकसभेची लढत दोन माजी आमदारांमध्ये होणार आहे. त्यामुळे दोन माजी आमदारांपैकी कोण बाजी मारणार याकडे उत्तर कन्नड लोकसभेचे लक्ष लागले आहे. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात उत्तर कन्नडमधील 6 आणि बेळगावमधील 2 असे एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील खानापूर , कित्तुर, तर कारवार जिल्ह्यातील हालियाळ, कारवार, कुमटा, भटकळ, शिरसी आणि यल्लापूर या सह मतदारसंघाचा समावेश असून यामध्ये पाच मतदारसंघात काँग्रेसचे तर तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात 16 लाख मतदार!

  • उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात एकूण 16,07,600, मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 8,09,887, महिला 7,97,691 आणि इतर 22 आहेत.

आतापर्यंत 10 वेळा काँग्रेस तर 6 वेळा भाजप चा खासदार!

  • उत्तर कन्नड आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 10 वेळा, भाजप 6 वेळा आणि अपक्ष उमेदवार एकदा विजयी झाले आहेत. लोकसभेवर आतापर्यंत निवडून आलेले जोकिम अल्वा 1952, 1957 आणि 1962 मध्ये सलग तीन वेळा काँग्रेसकडून विजयी झाले. 1967 – दिनकर देसाई (स्वतंत्र) 1971 मध्ये -बी. व्यंकण्णा नायक (काँग्रेस) 1977 मध्ये – बी.पी. कदम (काँग्रेस), 1980, 1984, 1989 आणि 1991 मध्ये सलग चार वेळा एम वाय नायक (काँग्रेस), तर 1996,1998 मध्ये अनंत कुमार हेगडे (भाजप) 1999 – मार्गारेट अल्वा (काँग्रेस), तर पुन्हा अनंत कुमार हेगडे (भाजप) 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग भाजपने मागील सलग चार निवडणुका जिंकल्या आहेत.

यावेळी काँग्रेसची बाजी पणाला लागणार ?

  • आतापर्यंतच्या 17 लोकसभेच्या निवडणुकात दहा वेळा काँग्रेस पक्षाने या भागात आपले वर्चस्व साध्य केले होते. पण 1996 नंतर काँग्रेसचा गड पुन्हा 1999 मध्ये मार्गारेट अल्वा यांच्या रूपाने तो आला पण 2004 मध्ये खानापूर तालुक्याने उच्चांकी मतदान दिल्यामुळे भाजपने या भागात पुन्हा आपले वर्चस्व साध्य केले व सलग पुढील चार निवडणुका भाजपने कायम जिंकल्या. पण या निवडणुकीत निवडून दिलेले खासदार अनंत हेगडे यांनी या भागातील मते मिळवली खरी पण मने मात्र मिळवली नाहीत. खासदार हेगडे यांनी नेहमी या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या भागातील मतदार त्यांच्या कामावर नाराज झाला व या वेळेच्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात यावे की नाही अशी पक्षश्रेष्ठी समोर अडचण झाली अखेर विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या हातात आता उमेदवारी देण्यात आली. पण माजी सभापती तथा माजी आमदार विश्वेश्वर कागेरी हेगडे हे राजकीय दृष्ट्या परिचयाचे आहेत. एक अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले, पण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिरशीतून त्यांना पराभव पत्करावा लागला. याची कारणे पाने मुळे वेगळीच आहेत. अलीकडच्या काळात खानापूर या भागाशी त्यांनी कधी अधिक संपर्क ठेवला नाही, तरीही ते माजी सभापती म्हणून परिचित असल्याने त्यांच्या कार्याचा प्रभाव खानापूर, कित्तूर भागातील मतदारावर किती पडणार हे आता निवडणुकीतच कळणार सध्या देशात भाजपची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव आहे पण उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात मागील चार वेळा निवडून आलेल्या खासदारांनी या भागात केलेले दुर्लक्ष हे नाराजीचे मूळ कारण असल्याने यावेळी मतदार भाजपला पुन्हा संधी देणार की काँग्रेस या ठिकाणी आघाडी राखणार? याकडे लक्ष लागले आहे.

खानापूरकरांचे उच्चांकी मतदान ठरणार विजयाची नांदी!

  • उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. यावेळी भाजपने अनंतकुमार हेगडे यांना तिकीट देण्याऐवजी माजी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना तिकीट दिले आहे.आता काँग्रेसने माजी आमदार अंजली निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे अंजली निंबाळकर ह्या खानापूरच्या माजी आमदार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर आणि खानापूर विधानसभा मतदारसंघ उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारित येत असले तरी, लोकसभा निवडणुकीसाठी त्या भागातून उमेदवार आल्याचे उदाहरण नाही. काँग्रेसने पहिल्यांदाच खानापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. यामागे अनेक गणिते आहेत. एकीकडे प्रभावशाली सामुदायिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन दुसरीकडे महिला उमेदवार उभे करून महिला मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचा आकडा काँग्रेस करत आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार माजी आमदार आहेत. खानापुरातून डॉ. अंजली निंबाळकर यांनी चांगले काम केले आहे. डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर भागात परिचित आहेत, मात्र कारवार जिल्ह्यामध्ये त्या नवीन व उत्साही महिला उमेदवार असल्याने महिलांच्यात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कर्नाटकात सुरू असलेल्या गॅरंटी योजना महिलांनाच अधिक लाभ झाल्याने यावेळी होणाऱ्या निवडणुकीत महिलांची मते ही निर्णायक ठरणार आहेत. लोकांपर्यंत पोहोचलेल्या हमी योजनांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

मराठा मतदार जाती /मातीला जागणार ?

  • उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात ब्राह्मण, मराठा, एससी एसटी अशा अनेक मतदारांची मोठी संख्या आहे. यामध्ये जवळपास 1.20 हजार ब्राह्मण समाज तर तब्बल 3.20 हजार मराठा मतदार आहे. शिवाय अल्पसंख्यांक, मागासवर्गीय जातीनिहाय मतदारांची संख्या ही अधिक आहे. त्यानी काँग्रेसच्या पाठीशी नेहमी पाठिंबा दिला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या क्षेत्रातील भाजपची उमेदवारी बहुतांशपणे ब्राह्मण समाजाला दिली आहे. मराठा मतदारही भाजपच्या पाठीशी राहून आत्तापर्यंतच्या निवडणुकात भाजपला निवडून आणले. पण 1996 पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. 1977 च्या काळात काँग्रेसने मराठा उमेदवार बी.पी. कदम यांना दिले होते. त्यांना निवडून आणण्यात मराठा मतदारांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी कारवार पासून बेळगाव पर्यंत सीमा भाग म्हणून महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रबळ होती. पण आज खानापूर भाग या सीमा लढ्याची प्रेरित असला तरी लोकसभेला काँग्रेसच्या पाठीशीच उभा होता. कारवार पासून हल्ल्याळ, जोयडा, दांडेली, खानापूर पर्यंत अजूनही बहुतांश जुन्या पिढीतील मंडळी आपल्या घरी मराठी पण जपतात, बदलत्या प्रवाहात मराठा मतदारही भरकटला होता. पण आता मराठा समाजाच्या एका महिला प्रतिनिधीला उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाला त्याचा चांगलाच लाभ होणार आहे असे दिसून येते. भाजपने आत्तापर्यंतच्या निवडणुकात भाजपाने ब्राह्मण मतांचे बळ, भाजप-जेडीएस युती, तसेच मराठा मतदारामुळे मुळे निवडणुकीत भाजपने सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना मतदारसंघाचा विसर पडला . त्यामुळे कारवार भागातील जनता काँग्रेसच्याच पाठीशी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काँग्रेसला विजयाचा विश्वास!

  • सध्या कारवार भागात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. अशातच या भागातून या रिंगणात किती उमेदवार राहणार यावरही बेरीज राहणार आहे. तसेच प्रभारी मंत्री मासेमारी समाजातील असून तो घटकही विजयात मदत करेल. भाजपचे शिवराम हेब्बार काँग्रेसमध्ये येणे फायदेशीर ठरू शकते. या सर्वांबरोबरच मतदारसंघात काँग्रेसच्या आमदारांच्या उपस्थितीचाही काँग्रेसला फायदा होईल, असा विश्वास नेत्यांना वाटत आहे. या सर्व बाबींचा फायदा घेत भाजप यावेळी भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय झेंडा फडकवणार का, याची उत्सुकता आता आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us